नगर – बंदला पाठिंबा; जिल्ह्यात आंदोलन

नगर – शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी लेबर व इतर लोकशाही विरोधी धोरण रद्द करावी, आदी मागण्यांसाठी भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी संघर्ष समन्वय समितीतर्फे नगर-पुणे रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याच बरोबर जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.

या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव ऍड. कॉ. सुभाष लांडे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, ऍड. कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. भैरवनाथ वाकळे, सुभाष तळेकर, कॉ. अर्शद शेख, रावसाहेब निमसे, विलास पेद्राम, युनुसभाई तांबटकर, सतीश पवार, भारती न्यालपेल्ली, संजय झिंजे, कॉ. मेहबूब सय्यद, सगुना श्रीमल, प्रा. अमन बगाडे, फिरोज शेख, सुभाष कांबळे, राहुल तांबे, सुरेश निर्भवणे, गणेश कंदूर, महादेव पालवे, गंगाधर त्र्यंबके, सतीश निमसे, अमोल पळसकर, राजेंद्र कर्डिले, तुषार सोनवणे, भरत खाकाळ, अरुण खिची आदींसह शेतकरी, हमाल व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन अस्तित्वात आलेल्या कायद्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी व वाढती महागाई कमी होण्यासाठी भारत बंदला पाठिंबा दर्शवित शहरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

प्रारंभी महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. अविनाश घुले म्हणाले की, भांडवलदारांच्या हितासाठी निर्दयी सरकार शेतकरी आंदोलनाची दखल घेत नाही. या कायद्यामुळे शेतकऱ्यांची भावी पिढी धोक्‍यात आली असून, पुढील पिढीचे भवितव्य वाचविण्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार आहे. देशातील प्रमुख मध्यवर्ती कामगार संघटना व देशातील दोनशेपेक्षा जास्त प्रमुख शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान कामगार संघर्ष समन्वय समितीने या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार आहे. हे कायदे मागे घेतले जात नाही, तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉ. सुभाष लांडे, अर्शद शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया यूथ फेडरेशन लालबावटा विडी युनियन, अ.भा. किसान सभा, आयटक, सिटू, हमाल पंचायत, राज्य सरकारी कर्मचारी, आम आदमी पार्टी, शहर सुधार समिती, हॉकर्स संघटना, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, प्राध्यापक संघटना, रेल्वे माथाडी युनियन, कामगार संघटना महासंघ आदी सहभागी झाले होते.

मोदी सरकार चले जाव…
अखिल भारतीय किसान सभेसह विविध संघटनांनी माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्तारोको आंदोलन केले. मोदी सरकार चले जाव… या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.