बंद इंजिनाचा साताऱ्याला उपयोग नाही

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
-राष्ट्रीय अस्मितेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन
-महाराष्ट्राच्या कारखानदारीसाठी पवारांनी काय केले?

सातारा – कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोदीभयाने पछाडले असून त्यांना मोदी द्वेष करण्यापलिकडे काहीच काम नाही. शरद पवारांनी साताऱ्यात बंद पडलेल इंजिन कितीही चालवलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. देशाचे भवितव्य कोणाच्या हाती सुरक्षित असणार आहे, याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे बालाकोट ऑपरेशनचे निर्लज्ज पुरावे मागणाऱ्या जातीयवादी शक्तींना भीक न घालता राष्ट्रीय अस्मितेसाठी नरेंद्र मोदी याचे हात पुन्हा बळकट करा, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात केले. दरम्यान, शरद पवार यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, पवारांनी कारखानदारीसाठी काय केले? ते सांगावे.

येथील गांधी मैदानावर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. आपल्या चाळीस मिनिटाच्या घणाघाती भाषणात केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना तपशीलवारपणे मांडताना विरोधकांवर फडणवीसांनी जोरदार घणाघात केला. फडणवीस पुढे म्हणाले, “यंदा महायुतीने नरेंद्र पाटील यांच्यासारखा उमदा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. देशाचे स्थैर्य, सुरक्षितता, अस्मिता, याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. गेल्या वर्षात कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारचा भ्रष्टाचार व अनाचार देशाने पाहिला. गेल्या पाच वर्षात मोदींनी सामान्य माणसाच पारदर्शी सरकार दिले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात देशाची सूत्र कोणाच्या हाती द्यायचे याचे उत्तर स्पष्ट झाले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचा राजकीय रागरंग बघून राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी ओपनिंग बॅट्‌समनचा नाद सोडून थेट बारावा खेळाडू म्हणून पवित्रा घेतला. म्हणूनच अकलूज येथील सभेत शरदरावजी को हवा का रुख जल्दी समझ आता हे अशी मिश्‍किली नरेंद्र मोदीजी यांनी केल्याची आठवणं फडणवीस यांनी केली. सतत मोदीद्वेष करणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोदी भयाने पछाडले असून त्यांना स्वप्नातही मोदीजीच दिसतात.

राष्ट्रवादी व कॉंग्रेस आज पराभूत मानसिकतेत असून त्यांच्याकडे प्रभावी वक्तेसुध्दा उरलेले नाहीत. त्यामुळे शरद पवारांनी भाड्याने रेल्वे इंजिन घेतले असून हे इंजिन साताऱ्यात आले होते का? असा सवाल फडणवीस यांनी केला. मात्र हे सतत बंद पडणारे इंजिन आहे, पवारांना याचा उपयोग होणार नाही, असा राजकीय टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना लगावला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आश्‍वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे, असा टोला लगावत फडणवीस म्हणाले, “गरिबीच्या विरोधात खरी लढाई नरेंद्र मोदी हेच लढले. मुद्रा जनधन योजना, उज्ज्वल गॅस, वृद्ध व असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन या सारख्या कित्येक योजना सामान्य माणसाच्या हिताच्या आहेत. गेल्या चार वर्षात देशात सगळ्यात जास्त एफआरपी महाराष्ट्राने दिला. जाणता राजा म्हणून गणल्या जाणाऱ्या पवारांनी काय केले? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी करून मोदींच्या दूरगामी निर्णयामुळे राज्यातील कारखानदारी वाचल्याचे ठामपणे प्रतिपादन केले. मात्र केवळ साखर उत्पादनावर कारखानदारी वाचणार नाही हे ओळखून नरेंद्र मोदी जी यांनी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले. उदयनराजे भोसले ज्या काही हजार कोटीच्या विकास कामाचा दावा करत आहेत, तो निधी भाजपा सरकारने दिला आहे. साताऱ्याला अमृत योजनेत दोनशे कोटी रूपये कोणताही राजकीय किंतु न ठेवता देण्यात आले.

कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते तेव्हा उदयनराजे यांना इतका निधी मिळाला का? त्यामुळे दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणण्याचे धंदे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंद करावेत. अशी सडकून टीका फडणवीस यांनी केली. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे प्रतारणा करणारी कलमे आघाडीच्या निर्धारनाम्यात आहेत. काश्‍मीरमध्ये लष्कराचे विशेषअधिकार कमी करणार हे महाखिचडीचे नेते निर्लज्जपणे सांगतात.

हेच पुन्हा बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागतात. पण आपल्याला राष्ट्रीय अस्मितेची कोणतीही तडजोड खपवून घ्यायची नाही, त्यामुळे अस्मिता सुरक्षित ठेवणाऱ्या नरेंद्र मोदींच्या हातीच पुन्हा सत्ता येईल, याची तजवीज करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वागत फलकावर तडीपाराचे छायाचित्र मराठ्यांच्या राजधानीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहर्ष स्वागत अशा लावण्यात आलेल्या फलकावर नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे यांच्या शेजारी साताऱ्यातून नुकताच तडीपार केलेल्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र पहायला मिळाले. ही बाब लक्षात येताच अनेक जणांनी त्या जाहिरात फलकाचे मोबाईलवरून काढून घेतले.

अशोक गायकवाड प्रथमच व्यासपीठावर
सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप, आरपीआय युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारात दुर्मिळ ठरलेले आणि पाटील यांचा आरपीआय स्वतंत्र प्रचार करण्याची घोषणा करुन त्यावर अंमलबजावणी करणारे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेसाठी प्रथमच व्यासपीठावर पहायला मिळाले. त्यामुळे नरेंद्र पाटील आणि अशोक गायकवाड यांच्यात काय ठरले? अशा चर्चा सभास्थळी सुरू होती.

सभेचे नेटके नियोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी सभा आयोजित केली होती. भर उन्हात सातारकर येणार का? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने भाजपने भव्य व्यासपीठ आणि समोर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी भव्य मंडप घातला होता. एकूणच सभेचे नेटके नियोजन केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.