मुंबई: राज्यात एकीकडे राणे आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वादग्रस्त विधान आणि त्यानंतर राणे यांना झालेली अटक या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काही दिवसांपूर्वी बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. या भेटीतील तपशील गुलदस्तात असला तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व पक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा झाली.
या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या 15 मिनिटं चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. विशेष म्हणजे राणेंच्या अटक नाट्याला दोन दिवस होत नाही तोच फडणवीस-ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याने राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जात आहे कि काय असा कयास लढवला जात आहे.