पुणे/फुरसुंगी – पुणे महापालिकेचा उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा, अशी आमची मागणी असताना येथे नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करून तो 15 वर्षे चालविण्याचे नियोजन पालिकेकडून केले जात आहे. भूमी ग्रीन एनर्जी ठेकेदारासोबत कचरा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. याला आमचा कडाडून विरोध असेल, यामुळेच कचरा डेपो कायमचा बंद करावा, असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला आहे. यावर मंगळवारी (दि. 15) चर्चा होणार आहे, असे नगरसेवक गणेश ढोरे यांनी सांगितले.
याबाबत समाविष्ट 11 गावांचे प्रभाग क्र. 42चे नगरसेवक गणेश ढोरे म्हणाले की,
कचरा डेपोची जागा हॉस्पिटल, ई-लर्निंग स्कूल, मैदानासारख्या लोकोपयोगी उपक्रमांसाठी वापरावी. पुणे शहराचा कचरा अनेक वर्षांपासून उरुळी देवाची, फुरसुंगी येथील कचरा डेपोत टाकला जातो. यामुळे वायू प्रदूषण, जलस्रोत प्रदूषण, वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
हा कचरा डेपो बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टप्प्याटप्प्याने हा कचरा डेपो पूर्णतः बंद करू, असे आश्वासन दिले होते. कचरा डेपोसाठी राज्य शासनाने देऊ केलेली जागा ताब्यात घेण्यासाठी मनपा प्रशासन सद्यस्थितीत कोणतेही ठोस प्रयत्न करत नाही.
हरीत लवाद आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत दररोज शेकडो टन कचरा डम्पिंग केला जात आहे. याला ग्रामस्थांचा विरोध असल्याचेही नगरसेवक ढोरे यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपो कायमचा बंद करून राष्ट्रीय हरीत लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या निर्देशाचे पालन करावे, अशी मागणी नगरसेवक ढोरे यांनी केली आहे.