पोंदेवाडी येथील खडी मशीन, डांबरप्लान्ट बंद करा

पोंदेवाडी ग्रामस्थांची मागणी

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी येथील खडकवाडी हद्दीवर असलेल्या खडी मशीन व डांबर प्लान्टच्या प्रदूषणामुळे पर्यावरणारणाला तसेच शेतातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित कारवाई करून खडी मशीन आणि डांबर प्लान्ट बंद करावेत, अशी मागणी सरपंच अनिल वाळुंज यांनी केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी (मंचर), उपजिल्हाधिकारी गौण खनिजकर्म विभाग (पुणे) व कार्यकारी अभियंता कुकडी प्रकल्प (नारायणगाव) यांना पाठविलेल्या निवेदनात सरपंच अनिल वाळुंज यांनी म्हटले आहे की, पोंदेवाडी आणि खडकवाडी हद्दीवर असलेल्या खडी मशीन व डांबर प्लान्टच्या धुराळ्यामुळे परिसरातील शेती पिके खराब झाली आहेत. तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. कर्कश मोठ्या आवाजामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या मोर पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दगडाच्या ब्लास्टिंगमधून उडणारे दगड पोखरवस्तीतील घरावर पडून घरांचे नुकसान होत आहे. खडी वाहतूक करणारी अवजड वाहने डिंभा उजव्या कालव्याच्या रस्त्यावरून जात असल्याने रस्ता खचला आहे.

खडी वाहतूक करणारी अवजड वाहने कालव्याच्या रस्त्याने जात असल्याने कालव्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कालवा फुटण्याचा धोका वाढला आहे. शासनाने त्वरित कारवाई करून खडी मशीन आणि डांबर प्लान्ट बंद करावा, अशी मागणी सरपंच अनिल वाळुंज यांनी दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×