भारतीय हवामान विभागाची (आयएमडी) माहिती….
पुणे (प्रतिनिधी) – बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्य मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरण्याचे संकेत आहेत. उद्यापर्यत(बुधवार) मान्सून गोव्यासह तळकोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान रविवारी मान्सूनने तामिळनाडूच्या बहुतांशी भाग दक्षिण कर्नाटकाचा आणखी काही भाग आणि आंध्र प्रदेशच्या रायलसिमा भागात प्रगती केली होती.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या माहितीनूसार, येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी-दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हवामानात जर असाच बदल होत राहिला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह देशातील बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतात, मान्सून पुढील दोन-तीन दिवसांत चांगलाच बरसण्याची शक्यता आहे. तर कोकण, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील उर्वरित भागात मान्सनू प्रगती करेल
अरबी समुद्रावरील दक्षिण-पश्चिमी वारा सक्रिय झाल्यामुळे, मान्सून कर्नाटक व रायलसीमाच्या काही भागात पाऊस पडून तो पुढे तेलंगणात पोहोचेल. तसेच मुंबईसह महाराष्ट्राच्या कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्रातही लवकरच पावसाळ्याच्या आगमनाचे संकेत मिळतील. राज्यात 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 71 टक्के जास्त झाला आहे. यात मध्य भारत आणि केरळ यांचं सर्वाधिक योगदान आहे.