हवामानात बदल; डासांची संख्या डबल

शहरात अचानक डासांची संख्या वाढली : औषध फवारणी कधी?

पुणे –
हवामान बदलाने हैराण झालेल्या पुणेकरांना डासांचा त्रास सुरू झाला आहे. थंडी संपून उन्हाळा सुरू झाला आहे. मात्र पहाटे किंचीत गारवा असल्याने हे सगळे वातावरण डासांच्या उत्पत्तीस पोषक आहे. त्यामुळेच डासांची संख्या वाढली आहे. ज्या भागात हा त्रास सुरू झाला आहे, तेथे औषध फवारणी करण्याची कार्यवाही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे.

मागील तीन चार दिवसापासून डासांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. दुसरीकडे जलस्रोतांवर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्यानेही डासांची संख्या वाढली आहे. या संदर्भात शहरातील ज्या भागातून महापालिकेच्या आरोग्य विभागाला तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या परिसरात कर्मचारी पाठवून डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधण्याचे आणि ते नष्ट करण्याचे तसेच त्याठिकाणी औषध, जंतुनाशके फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम पारंपरिक अवजारांचा वापर करून केले जात आहे.

जलपर्णी काढण्यासाठी लागणारा वेळ आणि ती वाढण्याचा वेग यात तफावत असल्याने ही जलपर्णी तांत्रिक पद्धतीने काढण्याची मागणी आरोग्य विभागाकडून वारंवार करण्यात आली आहे. हीच गोष्ट विचारात घेऊन जलपर्णी काढण्याचे काम वाहन विभागाकडे देण्यात आले होते. मात्र निविदा प्रक्रियेतील गोंधळामुळे ते काम पुन्हा आरोग्य विभागाकडे देण्यात आले आहे. यावर आता एखाद्या सामाजिक संस्थेची मदत घेण्याचा विचार असल्याचे आरोग्य विभागाचे सहायक अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.