बदलत्या हवामानामुळे हापूस संकटात

हापूस आंबा हे कोकणातील अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. विशिष्ट उत्तम स्वाद, चविष्टपणा आणि रंग यामुळे देश-विदेशातील खवय्यांच्या ए-वन पसंतीस उतरलेल्या कोकणातील हापूस आंब्याला ‘फळाचा राजा’ म्हटले जाते. केरळ, कर्नाटक आदी राज्यांतील आंबाही मार्केटमध्ये मध्यंतरी मोठ्या प्रमाणात आणला गेला.

काही ठिकाणच्या विक्रेत्यांनी हापूस आंबा असल्याचे सांगून ग्राहकांना केरळ, कर्नाटकमधील आंबा विकण्याचा प्रयत्न केला. पण्ा तो प्रयत्न फसला. खवय्यांच्या प्रथम पसंतीचा हापूस आंबा दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीच्या चक्रव्युहात सापडला आहे. निसर्गावर पूर्णत: अवलंबून असलेल्या अशा ह्या हापूस आंबा पिकावरील बदलत्या हवामानाचा फटका आंबा बागायतदारांना नेहमीच सहन करावा लागतो. त्यातच शासनाच्या धोरणात्मक धर-सोड वृत्ती आणि पीकविमा कंपन्या व बँका यांचा अडेलतट्टूपणा यामुळे आंबा बागायतदार मेटाकुटीस आलेले आहेत.

यावर्षी लांबलेल्या पावसामुळे ७० टक्के कलमांना मोहोर येण्याऐवजी पालवी आली. त्यामुळे १० टक्के हापूस आंबा कलमांना मोहोर आला. तसेच यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. त्यामुळे आंबा कलमे मोहोरण्यास वातावरणही अनुकूल नव्हते. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर डिसेंबर महिन्यात येतो व तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील मोहोर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येतो. यावर्षी ही सर्व प्रक्रिया एक महिना लांबणीवर पडल्याने एक महिना उशिरा पीक आले. परिणामी पहिल्या टप्प्यात केवळ १० टक्केच आंबा उत्पादन झाले. त्यातच गेल्या आठवड्यात उष्णतेची प्रखर लाट आली. ३८ ते ४० डिग्रीच्या वर तापमान वाढले. त्याचा विपरित परिणाम आंबा पिकांवर झाला.

हापूस आंबा उष्णतेमुळे भाजून मोठ्या प्रमाणात गळून पडला. जो वाचला तो उष्णतेने भाजल्याने त्यात पांढरा साका होण्याची भीती निर्माण झाली आहे. हापूस आंब्याचे उत्तम पीक आल्यास आणि त्या हंगामात चांगले हवामान असेल, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे १२५ हजार टन हापूस आंबा उत्पादन होते. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात ८० हजार टन, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार टन हापूस आंबा उत्पादन होते. यावर्षी उत्पादनामध्ये घट होऊन ३० ते ३५ टक्केच उत्पादन मिळणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात केवळ १० टक्केच हापूस आंब्याचे उत्पादन आलेले आहे. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे २० ते २५ टक्केच आहे. मात्र, ते मेच्या अखेरीस मार्केटमध्ये जाणार असल्याने त्या पिकाचा आंबा बागायतदारांना आर्थिक लाभ मिळत आहे.

साधारणत: फेब्रुवारी महिन्यात मार्केटमध्ये हापूस आंबा विक्रीला गेला, तर सध्या त्याला प्रति डझन ८०० ते १००० रुपये, तर ५ डझनच्या हापूस आंबा पेटीला तीन ते साडेतीन हजार दर वाशी मार्केटमध्ये मिळत आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने बागायतदारांचा उत्पादन खर्चही भागणार नाही अशी स्थिती आहे. दरवर्षी महागडी खते द्यावीच लागतात. तसेच कीटकनाशके व तुडतुडे नाशकांच्या फवारण्या कराव्याच लागतात. हापूस आंब्याचा उत्पादनाचा खर्च अमाप आहे. लहरी निसर्गाच्या सतत बदलत्या वातावरणामुळे आंबा पीक टिकवणे आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळविणे ही फार मोठी समस्या कोकणातील हापूस आंबा उत्पादकांच्या समोर कायमचीच आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.