“करोना’च्या भीतीने चिकनकडे पाठ; धुलवडीदिवशी वधारला मटणाचा भाव
सातारा – करोना व्हायरसचा प्रसार कोंबड्यांच्या माध्यमातून होत नसल्याचे पशुसंवर्धन मंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र, अफवांच्या बाजारात अजूनही चिकनचा दर उतरताच आहे.
एकीकडे चिकनचे भाव मातीमोल झाले असताना जास्त दराने विक्री होणाऱ्या मटणासाठी ग्राहकांनी धुलवडीदिवशी मंगळवारी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. सातारा शहर व परिसरातील अनेक मटणांच्या दुकानांवर सकाळपासून ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. चिकन खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने मटणाचे दर चांगलेच वाढले होते.
धुलिवंदन आणि मटणाचं नातं मांसाहारप्रेमींना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यातच “करोना व्हायरस’चा अप्रत्यक्ष फटका पोल्ट्री उद्योगांना बसला आहे. आधीच मटणाचे दर भडकलेले असताना कोरोना व्हायरसच्या भीतीने चिकनकडे ग्राहकांनी कानाडोळा केला आहे.
परिणामी मटणाचा दर आणखी वधारला आहे. खवैय्यांनी चिकनकडे पुरती पाठ फिरवल्यामुळे मटणाची मागणी वाढल्याने साताऱ्यात धुलीवंदनादिवशी ठिकठिकाणी मटण खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी सकाळपासून अनेक मटणाच्या दुकानांवर मोठी गर्दी झाली होती. मटणाचे दर 600 रुपयांवर गेलेले असतानाही ग्राहकांनी मटणालाच पसंती दिली.