#प्रभात_दीपोत्सव_२०२० : चटका

– प्रशांत सातपुते


माझ्या गावापासून वीसएक किलोमीटरवर इचलकरंजी हे गाव आहे. मी त्यावेळी बीएड्‌ला होतो. मला आजही आठवते, तो कॉलेजचा पहिलाच दिवस होता. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:ची ओळख करून देण्यासाठी पाच मिनिटे देण्यात आली होती. जेमतेम पाच फूट उंची, एकशिवडी देहयष्टी, काहीसे मळलेले, चुरगळलेले कपडे आणि डाव्या पायाने लंगडत चालणारा एकजण समोर उभा होता. 

“मी विजय घोडके! मंगळवेड्याचा… अं…’ बोलताना तो कधी खिशात हात घाली, तर कधी दोन्ही हातांची बोटे एकमेकात मिसळे. दिलेला पाच मिनिटांचा अवधी निसटून जात असतानाच आणखी काय बोलायचे, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

एकाएकी आठवल्यागत करून तो म्हणाला, “दामाजीपंत तुम्हाला माहीत असतीलच… ते माझ्याच… म्हणजे मी त्याच गावचा… मंगळवेढ्याचा.’ आणि त्याची पाच मिनिटे संपली. बिदरच्या बादशहाच्या काळात मंगळवेढ्याचे तहसीलदार असणाऱ्या दामाजीपंतांनी दुष्काळात होरपळणाऱ्या आपल्या जनतेसाठी शिक्षेची पर्वा न करता, सरकारी धान्याचे कोठार उघडून दिले. इतकेच या निमित्ताने आठवले. मात्र, साक्षात पांडुरंगाने कनिष्ठ जातीतील विठूच्या रूपात बादशहाकडे जाऊन, सहाशे खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहरा भरून त्याची रितसर पावती घेतली. असा आणखी बराच तपशील त्याच्याकडून नंतर कळला.

त्या वेळीतरी घोडके फार कुणाच्या लक्षात राहील असे वाटले नव्हते.त्याची उपस्थिती फार कधी जाणवत नसे. तो समोर दिसल्यावर मात्र ती जाणवायची. तो कधी कुणात मिसळत नसे. खूपच कमी बोलायचा तो.
कॉलेजच्या आसपास खोल्या होत्या, त्यामध्ये विद्यार्थी भाड्याने राहत. अशाच एका खोलीत तो राहायचा. त्याच्यासोबत खोलीत दिलीप सुतार, चंद्रकांत गुरव हेही राहत. त्याच्या खोलीत असणाऱ्या दिनदर्शिकेवर सोमवार, गुरूवार, शनिवार आणि अशाच काही वारांवर खुणा केलेल्या असत. बऱ्याच वेळेला हा रात्री गायब असायचा.

आमच्यासोबत चहाला अथवा त्याच्या रूम पार्टनरसोबत जेवताना तो फार क्‍वचित दिसे. एकदा आम्ही त्याच्या त्या खुणांचा अर्थ त्याला विचारला.
त्यावर, “”का उगी गरिबाची चेष्टा करता. गरीब खातंय खाऊ द्या की राव…” इतकच तो म्हणाला. या त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही.
बराचवेळ त्याच्या पाठीमागे लागल्यावर तो म्हणाला, “”त्या खुणा म्हणजे माझी मेस आहे.”
यावर आम्हा सर्वांचे कुतूहल आणखी वाढले.

“”एकदा आम्हालाही तुझ्या मेसमध्ये जेवू घाल ना. कसे ताट आहे? काय काय जिन्नस असतात?” असे प्रश्‍न त्याला आम्ही विचारले.

“”माझ्या मेसमध्ये जेवणासाठी पैसे लागत नाहीत. फक्‍त तुमच्या मनाची तयारी हवी.” त्याच्या या बोलण्याने आमचे कुतूहल आणखीन वाढले. आज गुरुवार आहे, आजच जाऊ. तयारीत राहा रात्री.- तो.

कॉलेज संपल्यानंतर कुतुहलापोटी मी घरी न जाता चंदू-दिलीपच्या खोलीवर गेलो. तेथून गप्पा मारत आम्ही फिरून आलो. वाटेत चहा घेतला. पुन्हा खोलीवर पोहचलो. एव्हाना घोडकेची स्वारी आमची वाटच पाहत बसली होती. “”मित्रांनो, केव्हापासून वाट पाहतोय तुमची! चला…”

गप्पांच्या ओघात वीसएक मिनिटांत आम्ही एका दत्त मंदिरात पोहोचलो. मंदिराच्या नूतनीकरणाच्या खुणा जागोजागी स्पष्टपणे जाणवत होत्या.भाविकांची बरीच गर्दी होती. श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन गाभाऱ्यातून आम्ही बाहेर आलो. बाजूच्या सभामंडपात महाप्रसाद सुरू होता.घोडकेच्या मेसचा उलगडा आता झाला होता.

“”नमस्कार… महाराज! आज माझ्या मित्रांनाही सोबत आणलंय.” तो बाजूच्या व्यक्‍तीबरोबर सलगीने बोलत होता. आम्ही तिघेही स्तब्ध होतो. इतक्‍यात महाराज जवळ आले. त्यांनी आम्हाला नमस्कार करत, महाप्रसादासाठी बाजूलाच बसण्याची विनंती केली. आम्ही तिघेही त्यांना नमस्कार घालून, महाप्रसादासाठी बसलो.

“”तुही बस ना… आमच्यासोबत…” घोडकेला आमच्यासोबत बसण्याची विनंती केली.
“”तुम्ही घ्या जेवून, मला अजून वेळ आहे.”

आम्ही जेवण्यास बसलो. तो वाढण्याचे काम करीत होता. आग्रहाने भरपेट जेवायला घालून, “पुन्हा म्होरल्या गुरुवारी यायचं!’ असं आगाऊ आवतण देत महाराजांनी आणि घोडकेने आम्हाला निरोप दिला.
दोघांनाही नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो. या घटनेने घोडकेच्या भीषण परिस्थितीची चांगली ओळख झाली होती. इचलकरंजीत आल्या-आल्या त्याने सोमवारी कोणत्या महादेवाच्या मंदिरात, शनिवारी कोणत्या हनुमान मंदिरात अथवा मठात महाप्रसाद असतो, याची माहिती काढली होती.

महाप्रसादाच्या दिवशी तो त्या ठिकाणी जाई. तेथील भाविकांना महाप्रसाद वाढण्याचे तो मनोभावे काम करी, त्यानंतर तो स्वत: जेवत असे. दिलीप-चंदूचा निरोप घेत, घोडकेचा विचार करतच मी घरी आलो.
दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये घोडके नेहमीसारखाच दिसत होता. आमच्या तिघांच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. त्या दिवशी आम्ही मित्रांनी ठरवून टाकलं. घोडकेला सर्वार्थाने जमेल तशी मदत करायची.त्या दिवसापासून घोडके आमचा चांगला मित्र बनला होता.

मी माझ्या गावातून जाऊन-येऊन कॉलेज करीत होतो. कधी-कधी सणासुदीला घरातून तिघांसाठी जेवणाचा डबा घेऊन जात असे. कधी मटणाचा डबा नेत असे. अशावेळी लेक्‍चरमधून उठून घोडके खोलीवर जाई आणि ताणून जेवायचा.

डब्यात आठ चपात्या होत्या. तीन मी खाल्ल्यात, बाकी तुमच्या दोघांसाठी ठेवल्यात, मटणाचा डबा ठेवलाय. जा पटकन खोलीवर… जेवून या. असे तो दिलीप-चंदूला कॉलेजमध्ये परत येऊन सांगे, आणि पुन्हा खोलीवर जाऊन मस्त झोप काढत असे. भरलेल्या पोटावर दोन्ही हात ठेवून निवांत झोपलेल्या घोडकेला पाहून आमच्या तोंडावर समाधान पसरत असे.

खोलीत अडकवलेला दिलीप-चंदूचा शर्ट अंगात घालून घोडके गावातून बिनधास्तपणे फेरफटका मारायचा. परत आल्यावर शर्ट खुंटीला अडकवत तो म्हणायचा, “खिशामध्ये चौतीस रूपये होते. वडापाव आणि चहासाठी सात रूपये मी खर्च केलेत. उरलेले पैसे खिशात ठेवलेत.’

कधी-कधी पॉलिश करून ठेवलेले बूटही बिनधास्त घालून फिरायचा. तसे तो सांगायचाही. त्याच्या या सवयीबद्दल त्याला कोणी काही बोलत नसे.

घर मालकिणीला सगळे विद्यार्थी मावशी म्हणत. या मावशीच्या आणि समोरच राहणारे पाटील नावाच्या शिक्षकांच्या घरी त्याचा राबता असायचा.या मावशीची सगळी कामे तो आनंदाने करायचा. अगदी तिच्यासोबत हा बाजारहाटला जाई. त्यादिवशी तो तिच्या घरी जेवत असे. कधी-कधी गमतीने तो एखादी चपाती लाटायचा आणि कंपास लावून बनविल्यासारखी ती वर्तुळातील चपाती मावशी पाहतच राहायची.
“अगं… ए भवाने… पोरासारखं पोर, किती गोलात चपाती बनवतेय, शिक जरा त्याच्याकडून.’

त्याच्या या कलेबद्दल सूनेला मात्र बोलणी खायला लागायची. मग एकदा त्याने तिला आपले कसब दाखवले. प्रथम कणकेचा गोळा लाटला.अपेक्षेप्रमाणे ती वेडीवाकडी चपाती होती. त्यानंतर त्या वेड्यावाकड्या चपातीवर छोटे ताट उपडे ठेवून गोलाकार चपाती काढली.

आमचे पहिले सत्र संपत आले होते. अभ्यासासाठी मी बऱ्याचदा त्यांच्या खोलीवर थांबत असे. एके दिवशी त्याने आम्हाला विचारले,
“”कोंबडी खाणार का आज!”
माझ्या डोळ्यासमोर “जश्‍न-ए-शादी’चा फलक दिसू लागला. त्याच्या संगतीत राहून आम्ही तिघेही बहुतेकवेळा त्याला बरे वाटावे म्हणून विविध महाप्रसादाचा आस्वाद घेत होतो. कधी-कधी नॉनव्हेज खायची इच्छा झाली की “जश्‍न-ए-शादी’चा फलक पाहून मुस्लीम लग्नात आम्ही बिनधास्तपणे जेवण झोडत असू. जणू आम्हा तिघांनाही त्याची सवय लागली होती.

“”काय रे आज कुठे मुस्लीम लग्न आहे का?” मी.
“”नाही. मी आज गावरान कोंबडी बनवणार आहे.”
“”गावाकडून पैसे आलेत का? आले असतील तर अजिबात खर्च करू नको.”
“”माझ्याकडून आज तुम्हाला पार्टी, मित्रांनो…”
“”घोडके… मी कोंबडी खाऊ घालीन, गावाकडून आलेले पैसे त्यासाठी खर्च नको करू.” मी म्हणालो.
“”मी आज कॉलेजला येत नाही. तुम्ही हवे तर येताना मेसमधून चपात्या वगैरे घेऊन या. तुमच्यासाठी छान कोंबडी बनवून ठेवतो.”

त्याला पैसे खर्च न करण्याविषयी पुन्हा-पुन्हा बजावत आम्ही तिघेही कॉलेजला गेलो. जाताना आमच्यात त्याचाच विषय होता. कदाचित आपण त्याला मदत करतोय, त्याची उतराई म्हणून तर हा आपल्याला पार्टी देत नसावा? असेही वाटले.

संध्याकाळी कॉलेजमधून परतलो. खोलीत शिरताच नाकात घुसलेल्या वासाने कोंबडी तयार झाल्याचे जाणवले. आम्ही तिघांनीही त्याला पैशाविषयी खोदून विचारले. परंतु, त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. त्या रात्री आम्ही “घोडके… जिंदाबाद’ म्हणत कोंबडीवर ताव मारला.
दुसऱ्या दिवशी दात घासत डालग्यातून काढून कोंबड्या हिंडायला सोडणाऱ्या मावशीला पाहून हा तिच्या जवळ गेला. तोही तिला मदत करू लागला. तशी मावशी डाव्या हातातील मिश्रित उजव्या हाताची तर्जनी टेकवून दात घासत बसून राहिली. कोंबड्या सोडता सोडता तो म्हणाला,
“”मावशे… कोंबड्या किती आहेत?”

तोंडातील मिश्रीची काळी कुळकुळीत पिंक समोरच टाकत ती बोलली,
“”तेरा” आणि तिने पुन्हा तोंडात बोट घातले.
कोंबड्या मोजून तो म्हणाला,
“”या तर बाराच आहेत!”

तशी ती जागेवरून उठत, कोंबड्या मोजू लागली. मावशी आणि तो पुन्हा-पुन्हा कोंबड्या मोजत होते. त्या बाराच भरत होत्या.
“”मावशे, एक कोंबडी पळवली कुणीतरी.”

हे ऐकून तिने हात झाडला. तोंडातली लाळ थुंकून तिने तोंड मोकळं केलं.मावशीच्या मोकळं झालेल्या तोंडाचा पट्टा आता सुरू झाला होता. मावशीसोबत तो गल्लीभर कोंबडी शोधून आला.
शांत झालेली मावशी सुनेवर दिवसभर खेकसत बसून होती.

घोडके साळसूदपणे आमच्याबरोबर कॉलेजला आला. त्याच्या रात्रीच्या पार्टीचा उलगडा आम्हाला झाला होता. त्याविषयी एकही चकार शब्द न काढता, तो दुसऱ्याच विषयावर गप्पा मारत राहिला.
समोर राहणारे पाटील नावाचे शिक्षक हे चेंगट म्हणून प्रसिद्ध होते.कोणत्याही गणेश मंडळाला ते कधी वर्गणी देत नसत. आमच्या घरी गणपती असतो, असे सांगून ते पिटाळून लावत.

कोजागिरीच्या कार्यक्रमाला मोठ्या मुश्‍किलीने दहा रुपये ती देखील जुनी नोट देऊन, दुधाचे पेल्यावर पेले रिचवत. अखेर दूध संपले आहे, असे जाहीर करावे लागे. अचानक त्यांच्या घरात सुया खुपसलेले लिंबू, बिब्बे, कोळसे सापडू लागले. याची चर्चा गल्लीत रंगू लागली. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणारे पाटील सर, वाढत्या प्रकाराने घाबरून गेले.

“”सर, हा भानामतीचा प्रकार आहे, विश्‍वास ठेवा अगर न ठेवा.” घोडके नेहमीसारखा त्यांच्या घरी जात म्हणाला.

पाटील सरांचा कदाचित यावर विश्‍वास नसावा. मात्र, त्यांच्या पत्नीचा असावा.
“”काय हो, यावर काय उपाय नाही का?” सरांच्या पत्नीने विचारले.
“”आहे, तर… वेताळाला उतारा टाकावा लागेल.” घोडके बोलला.
कसला उतारा?
“”एक जिवंत कोंबडी, उकडलेली अंडी, मटणाचं कालवण असं सगळं करून ते रविवारी स्मशानात टाकावं लागतयं.”

यावर पाटील सर बोलले, “”घोडके, सगळं तुम्हाला करून देतो, स्मशानात टाकायचं तेवढं तुम्ही बघा.”
“”ते मी बघतो! दोन दिवसानं रविवार आहे, आपण दुपारीच बाजार करू.”
सलग दोन दिवस नेहमीपेक्षा जास्त कधी लिंबू तर, कधी सुया खुपसलेले बिब्बे त्यांच्या घरात सापडले. हादरलेले पाटील सर रविवार उजाडायला घोडकेला बोलवायला दारात हजर होते. मग तोही उठला.
“”उतारा रात्री टाकायचा आहे. अजून वेळ आहे. जाऊ सावकाश.” तो म्हणाला.
“”कोंबड्यांचा बाजार खरं सकाळी भरतोय.”
“”मग आलोच दहा मिनिटांत. तोपर्यंत चहा ठेवा.”
पाटील सर निघून गेले. तसा हा आवरू लागला.

“”काय मित्रांनो, मटण खायचं का आज.” इतकंच तो बोलला, आणि चहा पिण्यासाठी पाटील सरांकडे निघून गेला. तासाभरात तो परत आला.त्यावेळी त्याच्या हातातील पिशवीत दोरीने पाय बांधलेली एक कोंबडी होती. तिला तशीच खोलीत ठेवून, तो पुन्हा निघून गेला. दुपारचे जेवण पाटील सरांच्या घरी उरकून हा खोलीत येऊन झोपला. सायंकाळी उठून तो चंदूला सोबत घेऊन पाटील सरांच्या घरी गेला. पुन्हा चहा घेत तो तयारीला लागला. बनवलेलं मटणाचं कालवण तो पत्रावळीत ठेवू लागला.

“”सर, सगळं कालवण द्या. “त्याच्या’ नावानं आणलेलं घरी ठेवायचं नसतंय.” सरांनी थोडं बाजूला काढून ठेवलेलं कालवण आणलं. तेही त्यानं पत्रावळीवरील द्रोणात ओतलं. भात ठेवला. त्यावर उकडलेली चार-सहा अंडी, सात-आठ चपात्या ठेवल्या आणि उदबत्ती पेटवून सरांच्या हातात दिली.
“म्हणा, जिकडली पिडा तिकडं टळू दे…’
तसे सर उदबत्ती उताऱ्याच्या नैवेद्याभोवती फिरवत पुटपुटले,
“जिकडली पिडा तिकडं टळू दे…’

आता मी हा उतारा टाकून येईपर्यंत दारं-खिडक्‍या बंद ठेवायच्या. मला माघारी येऊन हात-पाय धुवायला गरम पाणी ठेवा. अशी ऑर्डर देऊन चंदूला सोबत घेऊन तेथून तो निघाला, ते तडक सारं जेवण घेऊन खोलीवर आला.

प्रथम त्याने दुपारी आणलेल्या कोंबडीचे पाय सोडत तिला हळूच मावशीच्या कोंबड्यांच्या डालग्यात टाकली. मावशीच्या कोंबडीची सल कदाचित त्याच्या मनात टोचत असावी. त्याची भरपाई त्याने आज अशी केली होती. तोपर्यंत आणलेलं सगळं जेवण चंदूनं ताटात वाढून ठेवलं. तिघांनीही चेंगट मास्तराला कसं बनविलं, याची चर्चा करत सगळ्याचा फन्ना उडविला. मनसोक्‍त तृप्तीची ढेकर देत, चंदूला घेऊन पाटील सरांच्या घरी गेला. दार ठोठावताच, गरम पाणी घेऊन सर स्वत: बाहेर आले. दोघांनी हात-पाय धुतले. थोडावेळ गप्पा मारून ते दोघे खोलीवर परतले.

“आपणच पाटील सरांच्या घरी नजर चुकवून भानामतीचा तो मामला करायचो,’ अशी कबुली बऱ्याच दिवसांनंतर त्याने आमच्यासमोर दिली. दुसरे सत्र संपत आले. घोडकेला त्याचे प्रॅक्‍टिकल पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत केली. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीही मदत केली. परीक्षा संपली. सगळे खोली सोडून आपापल्या गावी गेले. प्रत्यक्षात निकाल लागला त्यावेळी तो नापास झाला होता. निकालपत्र घेऊन जो-तो गावी गेला होता. मी कॉलेजमध्ये चौकशी केली. तो निकाल नेण्यासाठीही आलेला नव्हता.

माझ्या पत्रकारितेच्या रोजमेळात घोडकेला मी पूर्णपणे विसरून गेलो होतो.दीडएक वर्षांनी एका सूतगिरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने इचलकरंजी जवळील एका गावी जाण्याचा योग आला. सभा संपवून मी जायला उठलो,
“”मित्रा, कसा आहेस.” अत्यंत कृश, दाढी वाढलेली, लंगडत येणाऱ्या त्या व्यक्‍तीने मला विचारले. तो घोडके होता.
“”तू येथे काय करतोयस.” त्याच्या सर्वांगावरून माझी नजर फिरत होती.डोळे खोलवर गेलेले, गालाची हाडे वर आलेली दिसत होती.
“”चल… आपण चहा घेऊ.” त्याने मला जवळच्या एका टपरीवर ओढूनच नेले. बहुधा त्याने तंबाखू खाल्ली असावी. खळखळून चूळ भरत, त्याने चहाची ऑर्डर दिली.
“”तू येथे कसा काय”
“”मी ह्या गिरणीत काम करतोय.” चहाचा कप माझ्या हाती देत तो बोलत होता.
“”माझा निकाल मला आधीच माहीत होता. मी निकाल आणायला गेलोच नाही.”
“”अरे, पण पुन्हा परीक्षा दिली असतीस ना”

“”काय करू बीएड्‌ होऊन? विना अनुदानित संस्थेत पाचशे रूपयांवर काम करतात आजचे शिक्षक. त्यातही दोन-दोन महिने पगार होत नाहीत. साधं शिक्षण सेवकाचं मानधन देताना मारामार…” तो पोटतिडकीने बोलत होता.
मोठ्या संस्थेत तीन-चार लाख मागतात कुठून आणायचे पैसे? तुला माहीतच असेल. तू पत्रकार आहेस.” तो म्हणत होता ती वस्तुस्थिती होती.
मग तू बीएड्‌ला आलास तरी का?

“”अपंग कोट्यातून प्रवेश मिळाला. वाटलं, आई-वडिलांसाठी काही करू.पण, शिक्षण सेवकाचं रूपडं कळाल्यावर मनच उडालं.”
“”तू गावी गेला नाहीस.” मी.
“”नाही. गावी जाऊन तरी काय करणार? तेथे दुसऱ्याच्या बांधावरच राबायचे होते. त्यापेक्षा इथे ओव्हरटाइम पकडून तीन हजार मिळतात.”
“”तू राहतोस कुठे?’

“”सुरुवातीला थोडे दिवस स्वामी समर्थांच्या मठात. सध्या जवळच खोली केली आहे. पण, महाप्रसादाला मठातच जातो अजूनही.”
त्याचा प्रत्येक शब्द अंगावर शहारे आणत होता.
“”गावी कोण असतं?’
“”आई-वडील, आता त्यांच्याने काम होत नाही. मीच पाठवतो थोडे पैसे.”
चहा कधीच संपला होता. त्याने खिशातून तंबाखू काढली आणि मळायला सुरुवात केली. त्याच्या त्या कृतीकडे मी पाहतोय हे समजून किंचित हास्य करीत तो पुन्हा म्हणाला,
“”तंबाखू, बिडीशिवाय खरा कामगार वाटत नाही. चल… येतोस मठात जेवायला?”
त्याच्या या प्रश्‍नाने भानावर येत, मी मानेनेच नकार दिला. तसा तो केवळ हसला.
“”कधी काय मदत लागली तर फोन कर.”
“निश्‍चित…’

माझे कार्ड त्याला देत, त्याचा निरोप घेतला. माझे कशात लक्ष लागत नव्हते. शिक्षणाने माणूस शिक्षित होतो. पण, पदवीनं माणूस कोडगा बनतो.छोटी कामं करण्यापेक्षा बेकारी पत्करतो. पोकळ सोयी-सुविधांच्या आणि सवलतींच्या गर्तेत “त्याने’ मात्र, कामगारपणाचं साधं समाधान शोधलं होतं.डोळ्यांच्या खोबणीत खोलवर गेलेल्या बुबुळात कमालीचे दारिद्य्र दाखवणारा त्याचा चेहरा नजरेसमोरून जाता जात नव्हता. मनाची नुसती घालमेल चालली होती. काही सुचत नव्हते. डोक्‍यात विचारांची गर्दी आणि गर्दी वाढत होती.

अशातच पहाटे कधीतरी झोप लागली. पुन्हा मी माझ्या कामात गुंतून गेलो. दोन-चार वर्षांत बऱ्याच कारखानदारांनी आपली दिवाळखोरी जाहीर केली. या बातमीने पुन्हा घोडकेच्या आठवणीने डोके वर काढले. त्याला शोधण्याचा एक-दोन वेळेला प्रयत्न केला. त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता.कदाचित तो गावी गेला असावा.

अचानक एके दिवशी वर्तमानपत्रात बातमी वाचायला मिळाली. “क्षयरोग… आरोग्य धाम असतानाही रूग्णाचा बेवारस मृत्यू’ मी बातमी पुन्हा पुन्हा वाचत होतो. बातमीतील नाव वाचून तोच विजय घोडके असेल का? असा प्रश्‍न पडत होता. मी तसाच उठलो. विजय घोडकेचा मृतदेह ज्या पोलिसांना मिळाला होता, त्या पोलीस ठाण्यात पोहोचलो.दारिद्य्र, बेकारीशी झगडता झगडता त्याला टीबीने केव्हा घेरले, हे त्याला कळलेच नव्हते. त्यानं शोधून काढलेलं, कामगारपणाचं साधं समाधानही त्याला फार काळ लाभलं नाही.

पोलिसांच्या मदतीने कॉलेजमधून त्याच्या गावचा पत्ता मिळवून मृतदेह घेऊन त्याच्या गावी गेलो. त्याच्या म्हाताऱ्या आई-वडिलांना पाहून मला भडभडून आले. सोबतच्या पोलिसाने सोपस्कार पूर्ण करत, चौघा समाजसेवकांच्या साक्षीने मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला. 

…त्या खुणा म्हणजे माझी मेस आहे… वाटलं, आई-वडिलांसाठी काही करू… महाप्रसादाला मठातच जातो अजूनही… त्याची चिता धडाधड जळत होती, त्याची ती वाक्‍ये मात्र, माझ्या मनाला चटका लावत होती. त्याच्या धडाडणाऱ्या चितेने आता माझ्या नजरेला धूसर बनवले होते…

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.