…अन्‌ घाटावरील चिखल झाला साफ

प्रभात इफेक्ट 

पिंपरी – पिंपरीच्या वैभवनगर घाटावर पुराच्या पाण्यामुळे माती आली होती. पाण्यामुळे ही माती भिजल्याने गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचे पाय घसरत होते. याबाबत दै. प्रभातमध्ये बुधवारी वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल महापालिकेने घेत तातडीने घाट साफ करून घेतला.
दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन मंगळवारी झाले. पिंपरीमधील घाटांच्या परिस्थितीचा आणि महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा दै. प्रभातने घेतला. यावेळी पिंपरीच्या वैभवनगर घाटावर पुराच्या पाण्यामुळे आलेली माती तशीच असल्याचे दिसून आले. ही माती ओली झाल्याने सर्वत्र चिखल झाला होता.

या चिखलातून जाताना भाविकांचे पाय घसरत होते. याबाबतचे वृत्त दै. प्रभातने प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली. बुधवारी सकाळी येथील घाटावरील माती पूर्णपणे पाण्याने धुवून काढली. यामुळे आगामी काळात भाविकांना होणारा त्रास दूर झाला आहे. तसेच नदीच्या किनाऱ्यालगतचा कचराही महापालिकेने साफ केला असून मंगळवारी पडलेला पायऱ्यांवरील कचराही उचलला आहे. यामुळे पिंपरीतील नागरिकांनी दै. प्रभात व महापालिकेचे आभार मानले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.