सफाई कामगारांचे आरोग्य धोक्‍यात

रुमाल अथवा कपड्याचा वापर

कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरविणे महापालिकेच्या ठेकेदारांची जबाबदारी आहे. परंतु, ठेकेदार कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी टाळत असल्याने दिसून येते. अनेकदा शहरात ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात येते. अशा वेळीही कर्मचारी तोंडाला मास्क न लावताच औषध फवारणी करताना दिसून येतात. याचबरोबर, पहाटेच्या सुमारास जागोजागी रस्ता साफ करणारे कर्मचारीही सफाई करताना स्वत: जवळील रुमाल किंवा फडके तोंडाला बांधून काम करतात. यामुळे, शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवित नसणाऱ्या ठेकेदारांवर पालिकेने तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर व उपनगरात कचरा गोळा करणाऱ्या बहुतांश सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे व मास्क मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुरक्षेसाठी विविध सुविधा पुरविण्यासाठी पालिका ठेकेदारांना पैसे पुरविते, मात्र बहुतांश ठेकेदार कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा पुरवित नसल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे, सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे पालिका प्रशासन या प्रकाराकडे दूर्लक्ष करत असल्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

शहर व उपनगरात दररोज घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येते. तसेच, काही ठिकाणी डंपरमधून कचरा गोळा केला जातो. शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी जाणाऱ्या घंटागाड्या सकाळी व रात्रीच्या सुमारास येतात. काही वेळेस घंटागाड्या दोन-तीन दिवस येत नसल्याने नागरिकांचा खोळंबा होतो. यामुळे, शहरातील हॉटेल व्यावसायिक व सोसायट्यांमधील नागरिकांनी घरात साचवलेला कचरा कित्येक दिवसाचा असल्याने त्यामध्ये घातक किडे, मुंग्या, अळ्या, माशा तयार झालेल्या असतात. यावेळी, कचरा गोळा करण्यासाठी आलेले सफाई कर्मचारी हातमोजे व मास्क न वापरताच डंपरमध्ये बसून कचरा वेगळा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कचऱ्यासारख्या दुर्गंधीमध्ये काम करताना कामगारांनी सुरक्षा साधणे वापरणे बंधनकारक असते. परंतु, ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे आरोग्याचे संरक्षण करणारी साधने कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. या परिस्थितीमुळे सफाई कर्मचारी हवालदिल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. बहुतांश ठिकाणी ठेकेदार कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवित नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

सफाई कर्मचारी जीव धोक्‍यात घालून कचरा गोळा करतात. या कचरा वेचकांचे नियमानुसार प्रशिक्षण शिबिर घेणे बंधनकारक असते. तसेच, सफाई कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार सुरक्षेसाठी आवश्‍यक साधने पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

ऍड. सागर चरण सदस्य-पुणे जिल्हा दक्षता समिती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.