मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांच्या सूचना
पुणे – विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकी घेवून संभाव्य आपत्ती निवारणासाठी आपत्ती निवारण आराखडा तयार करावा. तसेच प्रत्येक विभागांनी आपली यंत्रणा सतर्क ठेवून आपत्ती कोसळल्यास पीडितांना तातडीने मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्याचबरोबर शहरातील नाला सफाई प्राधान्याने करून घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. त्यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात चोवीस तास आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करावी. या कक्षात कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण द्यावे. विभागातील नदीच्या काठावरील सर्व गावे आणि शहरांनी आपल्या पूर रेषेची योग्य प्रकारे आखणी करावी. कोल्हापूर आणि सांगली या दोन शहरांना वारंवार पूराचा सामना करावा लागतो, या दोन्ही महानगरपालिकांनी विशेष दक्षता घ्यावी.
सांडपाण्याचे चेंबर व्यवस्थित बंद करून घ्यावेत, पूरस्थितीचा सामना करण्याबरोबरच या कालावधीत साथीचे आजार पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच सफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करण्यासाठी गमबूट, रेनकोट, हॅन्ड ग्लोव्हज यांसारख्या सुरक्षेच्या साधनांचा पुरवठा करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.