दिंडीतून स्वच्छता, साक्षरतेचा संदेश

पिंपळे गुरव – जुनी सांगवी येथील नृसिंह विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढीवारी निमित्त ग्रंथ दिंडी काढली. यामध्ये पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून डोईवर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता, साक्षरता तसेच पाणी वाचवा, झाडे लावा असे संदेश दिले.

भर पावसात विद्यार्थी मोठ्या उत्साहात या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. पालखी आकर्षक सजविण्यात आली होती. त्यात ग्रंथ ठेवण्यात आले होते. वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ वाजवत विठू नामाचा गजर करणारे विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. नगरसेविका माई ढोरे व सामाजिक कार्यकर्ते मनोहर ढोरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

दिंडी दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपला परिसर स्वच्छ राखावा, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, असे आवाहन केले. पाणी वाचवा, जीवन वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश दिला. या पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांचे गोल रिंगण देखील पार पडले. संस्थेचे संस्थापक श्‍याम कदम यांनी मुलांना खाऊ वाटप केले. विश्‍वस्त एकनाथ ढोरे, भास्कर पाटील यांनी आभार मानले. प्राचार्य सुरेंद्र वरुडे यांनी दिंडीचे संयोजन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.