अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर स्वच्छता अशक्‍य

रिक्‍त पदे तातडीने भरण्याकडे कानाडोळा : स्वच्छ सर्वेक्षणासाठी सर्वच अधिकारी, कर्मचारी गुंतले


मनुष्यबळ नसल्याने आरोग्य विभागाला “लकवा’

पुणे – “स्वच्छ सर्व्हेक्षण 2020′ या स्पर्धेत खरे उतरण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने कंबर कसली असून कामाला सुरुवात केली आहे. अन्य विभागातील अधिकाऱ्यांनाही यामध्ये सामील केले आहे. केंद्रीय सर्व्हेक्षण पथक येऊन गेल्यानंतर पुन्हा “ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती होणार असल्याने स्वच्छता अशीच ठेवायची असेल, तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरा अशी मागणी होत आहे.

सध्या शहरातील रस्त्यांवरील दुभाजकांपासून सार्वजनिक सीमाभिंतींची रंगरंगोटी तसेच रस्त्यावर कचरा दिसणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. यामध्ये महापालिका आयुक्‍त ते अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुख हे स्वत: सहभागी झाले आहेत. अन्य अधिकारी हे आतापुरतेच सहभागी होणार आहेत. सर्व्हेक्षणानंतर ते आपापल्या विभागात परततील. परंतु कायमस्वरूपी प्रश्‍न सोडवायचा असेल, तर मनुष्यबळ वाढवणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

शहर स्वच्छतेसाठी “सीएसआर’ अर्थात कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून कचरा संकलनासाठी एका कंपनीची मदत घेतली आहे. तसेच ठेकेदारी पद्धतीनेही झाडण कामांसाठी चतुर्थश्रेणी कामगार नेमण्यात आलेले आहेत. मात्र, या सर्वांचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच संख्या लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नसल्याने सॅनिटरी इन्स्पेक्‍टर आणि त्यावरील अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत वर्षभर हे अधिकारी आणि कर्मचारी प्रतिदिन शहर स्वच्छतेसाठी कष्ट करत आहेत. या स्पर्धेसाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्चही करत आहेत. परंतू कायमच सर्व शहरे स्वच्छ राहावीत, यासाठी केंद्राच्यावतीने दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येत असल्याने वर्षभर वर्ग तीन आणि चार च्या अधिकाऱ्यांना अहोरात्र काम करावे लागत आहे.

यावर्षीची स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून, सर्व्हेक्षणासाठी केंद्रातून पथकही दाखल झाले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामाला जुंपले आहे. याचा परिणाम प्रत्येकच्या विभागाच्या कामावर होत आहे. दरवर्षी या स्पर्धेमुळे स्वच्छतेशिवायच्या कामांवर परिणाम झाल्यास प्रकल्पांची कामे रखडणार आहेत.

पदे आणि रिक्‍त मनुष्यबळ
सुमारे अडीचशेहून अधिक कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या पुणे शहरात सुमारे 1,350 कि.मी.चे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी 11 हजार 422 चतुर्थश्रेणी कर्मचारी, तर त्यांच्याकडून स्वच्छतेचे काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांची मान्य संख्या 1 हजार 620 इतकी आहे. परंतू मागील काही वर्षात या मान्य पदांपैकी अनेक जागा रिक्त आहेत. यामध्ये चतुर्थश्रेणीच्या कामगारांची तब्बल 3,671 पदे रिक्त आहेत. तर त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या सॅनिटरी इन्स्पेक्‍टर्सच्या 264पैकी तब्बल 100 जागा रिक्त आहेत. तसेच सॅनिटरी इन्स्पेक्‍टर्सवरील अधिकाऱ्यांची अर्थात डी.एस.आय.ची 43पैकी 21 पदे रिक्त आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.