विलगीकरण कक्षाची प्रत्येक 2 तासाला स्वच्छता

जेवण इतर सुविधाही वेळेत देणार


स्वच्छतागृह दिवसातून पाचवेळा स्वच्छ करणार


बाधित आणि संशयित रुग्ण वेगळे ठेवणार

पुणे – शहरातील करोनाबाधित आणि संशयित रुग्णांना महापालिकेकडून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या विलागीकरण कक्ष आणि कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले आहे. मात्र, या केंद्रामध्ये महापालिकेकडून स्वच्छता, वेळेवर जेवण तसेच इतर अत्यावश्‍यक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी थेट महापालिका आयुक्‍तांच्या तसेच केंद्रीय पथकांच्या पाहणीवेळी केल्या आहेत.

तसेच या केंद्रातील लोक आता बाहेर येऊन थेट आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या प्रकारची गंभीर दखल महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी घेतली आहे. तसेच, या केंद्रावर वेळेवर जेवण, स्वच्छता साधने तसेच स्वच्छतागृहाची दिवसातून पाचवेळा स्वच्छता करण्याचे लेखी आदेश बुधवारी सकाळी दिले आहेत.

असे आहेत आयुक्‍तांचे आदेश
– क्वारंटाईन सेंटरची दिवसभरात प्रत्येकी 2 तासाने व्यवस्थित साफसफाई करण्यात यावी.
– साफसफाई झाल्यानंतर सर्व प्रकारच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट तातडीने लावावी. जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावावी.
– दाखल केलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधा (उदा : मास्क, सॅनिटायझर, जेवण, पाणी, लाईट व इतर) पुरविण्यात याव्यात.
– दाखल केलेल्या नागरिकांची सर्व नोंदी रजिस्टरला ठेवण्यात याव्यात.
– दाखल केलेल्या नागरिकांचा माहिती तक्‍ता व सेंटर प्रकार दर्शवणारा फलक दर्शनी भागावर लावण्यात यावा. कचरा दररोज तातडीने उचलण्यात यावा.
– दाखल झालेल्या नागरिकांसाठी प्रत्येकी 5 नागरिकांमागे एक पाण्याचा जार व त्यासोबत डीस्पोजल ग्लास देण्यात यावेत.
– सर्व येणाऱ्या नागरिकांना कापडी मास्क देण्यात यावेत.
– इमारतीमधील सर्व खोल्या दिवसातून एकदा व व्हरांडा दिवसातून तीनदा स्वच्छ करावा.
– इमारतीमधील सर्व स्वच्छतागृह दिवसातून किमान 5 वेळा स्वच्छ करावेत.
– सर्व सफाई कर्मचारी व जेवण पुरविणारे कर्मचारी यांनी पीपीई कीटचा वापर करावा.
– रुग्ण दाखल झाल्याची व सोडल्याची नोंद रजिस्टर दररोज अपडेट करावे.
– बाधित आणि अहवाल प्रलंबित रुग्ण स्वतंत्र जागेवर ठेवावेत.
– प्रत्येक केंद्रावर शक्‍यतो एक ऍम्बुलन्स 24 तास उपलब्ध करून द्यावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.