सातारा – गेंडामाळ नाका परिसरातील हुतात्मा उद्यानाच्या वॉकिंग ट्रॅकलगत लॉनच्या जागी वाढलेल्या गवताची कापणी पालिकेकडून करण्यात आल्याने उद्यानातील लॉनची जागा पूर्ण मोकळी झाली आहे.
उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घातल्याने बागेत नियमितपणे येणाऱ्या गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने उपनगराध्यक्षांना धन्यवाद देण्यात आले. हुतात्मा उद्यानातील सिंथेटिक ट्रॅकच्या अंर्तगत भागात लॉनच्या मोकळ्या जागेत मोठया प्रमाणावर गवत वाढले होते. या गवताची उंची तब्बल पाच फुटापर्यंत वाढल्याने बागेच्या हिरवाईची रया गेली होती. तसेच व्यायामासाठी आणि सायंकाळी येणाऱ्या महिला- मुलांची गैरसोय होत होती. दै. “प्रभात’ने दि. 1 फेब्रुवारीच्या अंकात उद्यानात वाढलेल्या गवताची बातमी छायाचित्रासह प्रसिद्ध करुन नगरपालिकेचे लक्ष वेधले.
उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्याशी तातडीने संपर्क साधून हुतात्मा उद्यानात सफाई मोहिमेच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी वृक्ष विभागाच्या अंर्तगत उद्यानातील गवताची कापणी करून लॉनचा परिसर एकदम स्वच्छ केला. त्यामुळे व्यायामासाठी उद्यानात येणाऱ्या नागरिकांना चालण्यानंतर व्यायामासाठी मुबलक जागा उपलब्ध झाली आहे.