स्वच्छ सर्वेक्षणात कराड देशात प्रथम

कराड – केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या स्पर्धेत 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये तसेच पश्‍चिम विभागासह महाराष्ट्रातही लहान शहरांमध्ये कराड शहराने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या एकूण 5 हजार गुणांपैकी कराड शहरास 4063 गुण मिळाले. महाबळेश्‍वरने 8 वा क्रमांक, पाचगणीने 13 वा क्रमांक, तर कोरेगाव शहराने 36 वा क्रमांक पटकावला आहे. केंद्रिय आवास आणि विकास राज्यमंत्री हरदिप सिंह पुरी यांच्या हस्ते विज्ञान भवन, दिल्ली येथे बुधवारी पालिकेचा गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील एकूण चार शहरांनी देशस्तरावर पारितोषिक पटकावल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी नागरिकांनी जल्लोष केला. तर या गौरवाने कराडच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. स्मिता हुलवान, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्विकारला. देशात प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती कळताच कराड शहरात नागरिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्‍त केला. तर काहींनी फटाक्‍यांची आतषबाजी केली.
गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात 39 वा क्रमांक कराड नगरपालिकेने मिळवला होता. सन 2019 च्या स्पर्धेत अव्वल येण्याच्या दृष्टीने वर्षभर जोरदार प्रयत्न करण्यात आले आहेत. यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.

गतवर्षी देशात प्रथम येण्याचा मान मिळविलेल्या इंदौर शहराचा दौराही करण्यात आला होता. तसेच मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी जपान येथेही भेट देवून तेथील कार्यपद्धतीची पाहणी केली होती. या दोन्ही दौऱ्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे कराड शहरात नवनवे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये हायटेक स्वच्छतागृहे, शंभर टक्‍के हागणदारीमुक्‍त शहर, प्लास्टिक मुक्‍त शहर, कचरा संकलन, कचरा वर्गिकरण, कचऱ्यापासून खत व विजनिर्मिती, कचरा डेपोमुक्‍त शहर यामुळे शहराला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

पालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबरच शहरातील विविध सामाजिक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी व महिलांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. दर पंधरा दिवसांनी महास्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाचे सातत्यपूर्ण नियोजन व परिश्रमामुळे पालिकेने राज्यात पहिल्या क्रमांकांचा बहुमान प्राप्त केला आहे. स्वच्छता दूतांनीही यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने पालिकेस हे यश मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्‍त होत होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.