पालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकांची “ड्युटी’
पुणे – शहरात जोरदार सुरू असलेले “स्वच्छ भारत मिशन’ विधानसभा निवडणुकांमुळे जवळपास महिनाभर ठप्प होणार आहे. घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांना निवडणूक “ड्युटी’ लागल्यामुळे हे मिशन महिनाभरासाठी स्थगित करावे लागणार आहे.
घनकचरा विभागाकडील आरोग्य निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ड्युटी लागल्याने पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 0 ते 100 टक्के हे स्वच्छतेचे मिशन किमान पुढील महिनाभर ठप्प होणार आहे. विशेष असे की, स्वच्छतेच्या बाबत पुणे महापालिकेचा क्रमांक घसरल्याने महापालिकेने यावेळी लाखो रुपये खर्च करून शहर स्वच्छतेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत.
दि.21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान, दि.24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी मोठ्याप्रमाणावर मनुष्यबळ लागणार असून, पुणे महापालिकेतील काही अत्यावश्यक विभागातील वरिष्ठ अधिकारी वगळता दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाची ऑर्डर देण्यात आली आहे. हे काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांना ते टाळता येणार नाही. याशिवाय विभागांप्रमाणेच अतिक्रमण तसेच घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आले आहे. यामुळे या दोन्ही विभागातील कामांत आतापासूनच असमन्वय दिसून येत आहे. एकीकडे मागीलवर्षी स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर पुणे महापालिकेचा क्रमांक घसरल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावर्षी वरच्या क्रमांकाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन विविध उपक्रम आणि जनजागृतीसाठी योजना आखल्या आहेत. या कामासाठी सल्लागारही नेमले आहेत. त्यानुसार कामांची जबाबदारी ही आरोग्य निरीक्षकांवर आहे.
निरीक्षकांना काय उत्तर द्यायचे?
निवडणूक कालावधीत शहर स्वच्छतेची माहिती घेण्यासाठी केंद्रीय आणि राज्यातील या योजनेचे निरीक्षक पाहणीसाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्याचवेळी आरोग्य निरीक्षकच उपलब्ध नसल्याने या पथकांना माहिती द्यायची कशी, हा प्रश्न घनकचरा विभागाला पडला आहे. त्यामुळे या आरोग्य निरीक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.