नवी दिल्ली- हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी 106 पानांचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात अदानी समूहावर स्टॉकचे 85 टक्क्यांनी जास्त मूल्यमापन केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल समोर आला आहे.
समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘प्रथमदर्शनी विद्यमान नियमांचे किंवा कायद्यांचे कोणतेही उल्लंघन आढळले नाही’. असे म्हणत गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ञांच्या पॅनेलने शुक्रवारी क्लीन चिट दिली आहे.
शेअर मार्केट ने दाखवली तेजी…
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल सार्वजनिक होताच अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांनी मोठी झेप घेतली आहे. अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनचे समभाग प्रत्येकी पाच टक्क्यांच्या वाढीसह वरच्या सर्किटवर आले.
शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात अदानीचे शेअर्स कमजोर दिसत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल समोर येताच शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे.