“क्‍लीन बोल्ड!’

डॉ. अमोल कोल्हे शिरूरचे नवे खासदार

पुणे -तो आला.. त्याने पाहिले.. अन्‌ त्याने जिंकले… असंच वर्णन करावे लागेल शिरूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच थेट खासदारकीची निवडणूक लढणाऱ्या व ती जिंकणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयाचं! अगदी भल्या-भल्यांना आव्हान देणाऱ्या शिवाजीराव आढळरावांनी चौकार लगावण्याची जोरदार तयारी केली होती; मात्र त्यांच्याच पक्षातून शिवसेनेतून डॉ. अमोल कोल्हेंना आपल्या पक्षात राष्ट्रवादीमध्ये घेत शरद पवार यांनी गुगली टाकली आणि मतदारसंघात फिल्डिंगही अशी लावली की आढळराव पाटील क्‍लीन बोल्ड झाले.

राज्यासह देशभरात भगवी लाट असताना शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत तब्बल 60 हजारांवर मतांनी लीड घेत विद्यमान खासदारांना घरी बसवले. तेच ते जुने प्रश्‍न, वैयक्‍तिक टीका, जातीयवादी वक्तव्ये, रखडलेली महत्त्वाची विकासकामे या बाबी शिवसेनेच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. याउलट दमदार वक्तृत्त्व, कोठेही गडबडून न जात शालीन प्रचार, पक्षातील सर्वांसह मित्रांची योग्य पद्धतीने बांधलेली मोट, कोठेही गटतट नाहीत यामुळे या मतदारसंघात घड्याळाचे काटे जोरात धावले. मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला चेहरा व राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह असलेले घड्याळही घराघरात पोहोचले असल्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या उमेदवाराची ओळख मतदारसंघात करून देण्यात सोपे गेले. मतदारसंघात तशी पाहिली तर लढत ही दुरंगीच झाली; मात्र निकाल फिरवला तो महिलावर्ग आणि युवा मतदारांनी. सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. अगदी पहिल्या फेरीपासून कोल्हे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत वाढतच गेली. कोणत्याही फेरीत आढळराव यांचा वरचष्मा दिसून आला नाही. किंबहुना 2014 मध्ये त्यांनी सर्वच विधानसभा मतदारसंघातून आघाडी घेतली ती यावेळी अमोल कोल्हेंनी. 2014मध्ये विरोधी पाच आमदार असताना आढळरावांनी विजय मिळवला होता. तर अमोल कोल्हेंच्या बाबतीतही विरोधी पाच आमदार असताना त्यांना जनतेने कौल दिला.

स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्यानंतर जुन्नर तालुक्‍याला डॉ. अमोल कोल्हेंच्या रुपाने दुसरा खासदार मिळाला आहे. या तालुक्‍यात शिवसेनेचे असलेले वर्चस्व त्यात निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदारांनी केलेला शिवसेना प्रवेश यामुळे येथे शिवसेनेची ताकद वाढलेली असतानाही जुन्नरकरांनी भूमिपुत्रालाच कौल दिला. गावेच्या गावे पक्ष आणि मतभेद विसरुन भूमिपुत्रासाठी एक झाली. धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असे स्वरूप निवडणुकीला दिले गेले. किंबहुना कोल्हेंना अनेकांनी आर्थिक मदतही देऊ केली, त्यांनी केलेले भावनिक आवाहन जनतेच्या मनात घर करून गेले. त्याची फलप्राप्ती मताधिक्‍य मिळण्यात झाली.

शिवाजीराव आढळराव पाटील हे आंबेगावचे भूमिपूत्र. प्रत्येक निवडणुकीत त्यांना आंबेगावने मोठे लीड दिले. मात्र यावेळी थेट वळसे पाटील यांच्यावर केलेली टीका मतदारांच्या पचनी पडली नाही. त्याचप्रमाणे वळसे पाटील यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढली गेल्याने त्यांच्याही अस्तित्त्वाचा मुद्दा होताच. शिवाय लोकसभा आणि विधानसभेला दोन्ही पाटलांची सेटलमेंट होते, हाही शिक्का पुसायचा होता. सातत्याने एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या या दोघांमध्ये चौथ्या प्रयत्नात का होईना, वळसे पाटील भारी पडले अन्‌ स्वतःच्या आंबेगावातून आढळरावांना मताधिक्‍य घेता आले नाही.

खेड हा नेहमीच आढळरावांना लीड देणारा तालुका म्हणून पाहिला गेला. यावेळी या तालुक्‍यानेही आढळरावांना साथ दिली नाही. येथील अनेक प्रश्‍न हे आढळरावांच्या विरोधात गेलेले पाहायला मिळाले. चाकण विमानतळाचे झालेले स्थलांतर, पुणे-नाशिक महामार्गावर होत असलेली कोंडी, स्थानिकांना न मिळालेला रोजगार, प्रकल्पबाधितांचे रखडलेले पुनर्वसन हे मुद्दे विरोधकांनी हायलाइट केले. त्याला जनतेची भावनिक साद मिळाली. त्याचबरोबर तालुुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सहकारक्षेत्रावर असलेली घट्ट पकड, मित्रपक्षाने दिलेली साथ, अणि कोणतीही गटबाजी नसल्याने येथे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात अमोल कोल्हेंना यश आले.

शिरूर-हवेलीत राष्ट्रवादीचे सर्वच नेते कधी नव्हे ते एकत्र आले. एकमेकांतून विस्तवही जात नसताना प्रचारात हे नेते खांद्याला खांदा लावून जीवाचे रान करताना पाहायला मिळाले. निवडणुकीआधी स्वतंत्र चूल मांडलेल्या मंगलदास बांदल यांना राष्ट्रवादीने चुचकारत थेट प्रदेश पातळीवरील उपाध्यक्षपद देत आपल्या गोटात सामावून घेतले. हवेलीतही राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव दिसला. येथे यशवंत कारखाना हा कळीचा मुद्दा ठरला. मुळात शहरी मतदारांमध्ये अमोल कोल्हे यांची अभिनेता म्हणून क्रेझ होतीच, त्याचे मतदानामध्ये रुपांतर करण्यात पक्षाला यश आले. याउलट शिवसेना-भाजपला शक्‍य असतानाही येथे प्रभाव पाडता आला नाही.

आढळराव पाटलांना भोसरीमधून मोठी आशा होती. 2009मध्ये विरोधी उमेदवार हे भोसरीचे असतानाही तेथून आढळरावांनी लीड घेतले होते. 2014ला हे लीड आणखी वाढले होते. यावेळी याच मतदारसंघातून सर्वाधिक मतदान झाल्याने हा मतदारसंघ आपल्याला नक्कीच तारणार अशी अपेक्षा शिवसेनेची होती. शिवाय शेवटच्या क्षणी आमदार महेश लांडगे यांनीही प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. मात्र याआधीचे मतभेद पाहता आमदारांच्या कार्यकर्त्यांनी येथे मनापासून काम केले नसल्याचे दिसले. याउलट तिकिट न मिळाल्याने नाराज न होता माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षाचे काम अगदी प्रामाणिकपणे केले. त्यांना विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांचीही तेवढीच तोलामोलाची साथ लाभली. यामुळे येथील मतदारांना यावेळी अमोल कोल्हे हेच जवळचे वाटले.

हडपसर मतदारसंघात अमोल कोल्हे यांना आशा होतीच, झालेही तसेच. अमोल कोल्हेंच्या खासदार होण्यामध्ये हडपसरकरांचा वाटा हा मोलाचा राहिला आहे. येथील माळी समाजाचे एकगठ्ठा योगदान कोल्हेंच्या मागे राहिल्याचे दिसले. त्यातच हा शहरी मतदारसंघ असल्याने येथे अभिनेता म्हणून अमोल कोल्हेंची आधीपासूनच क्रेझ आहे. त्याचा लाभ त्यांना मतदानामध्ये झाला. याशिवाय राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्त्वाने तळागाळापर्यंत पोहचून आपल्या उमेदवाराचा प्रचार केला. कोणताही धोका न पत्करता अतिशय चाणाक्षपणे घराघरातून आपल्यालाच मतदान कसे मिळेल, याचीही दक्षता घेतली गेली. याचे रुपांतर डॉ. अूमोल कोल्हेंच्या विजयात झाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.