महाराष्ट्रातील सगळ्यात स्वच्छ वेळणेश्वरचा समुद्रकिनारा

वेळणेश्वरचा समुद्र मऊ वाळूसाठी प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्याला ७२० किमीचा लांब समुद्रकिनारा लाभला आहे. त्यातही २३७ किलोमीटर अशी सर्वात लांब किनार पट्टी रत्नागिरी जिल्ह्याला लाभली आहे. या मोठ्या किनार पट्टीवर असलेले छोटेखानी, हिरवेगार आणि पर्यटनासाठी उत्कृष्ट शहर म्हणजे वेळणेश्वर. स्वच्छ हवा, पांढरेशुभ्र किनारे, निळे समुद्राचे पाणी, माडांची बने आणि अमूल्य अशी जैवविविधता येथे आहेत. रविवारच्या सहलीपासून ते महिनाभराच्या शहरापासून लांब निवांत वास्तव्यासाठी सुंदर पर्याय ठरू शकतो. महाराष्ट्रातील सगळ्यात स्वच्छ असा वेळणेश्वरचा समुद्र त्याच्या मऊ वाळूसाठी प्रसिद्ध आहे. हे नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी वेळणेश्वरला भेट देणे अपरिहार्य ठरते.

जवळची प्रेक्षणीय ठिकाणे, मंदिरे
प्रत्येक गावाचा खास असा इतिहास असतो, ज्याच्याद्वारे तो गाव आपल्याशी संवाद साधत असतो. वेळणेश्वरचे शिवमंदिर त्या गावइतकेच जुने म्हणून त्याच्या इतिहासाची साक्ष देणारे आहे. मंदिराची एक बाजू रोज भरतीच्या वेळी पाण्यात लुप्त होऊन ओहोटीला दृष्टीस पडते. हे बुडणारे स्तंभेश्वर महादेवाचे मंदिर बघण्यासाठी जगभरातून लोक येतात. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते तसेच महाशिवरात्रीचा उत्सव येथील मोठे आकर्षण आहे. याव्यतिरिक्त जवळच असलेले हेदवीचे दशभुज गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. शिवाय शास्त्री नदी, अन्जनवले किल्ला, व्याघ्राम्बरी मंदिर, लक्ष्मी-नारायण मंदिर, उमा-महेश मंदिर ही स्थळे पर्यटकांच्या विशेष पसंतीची आहेत.

उपक्रम आणि अन्य आकर्षणे
वेळणेश्वर हे शहरापासून थोडे दूर मात्र सोयीसुविधांनी युक्त असल्याने पर्यटनाचा मनमोहक अनुभव देऊन जाते. येथे राहून पोहणे, सूर्याच्या कोवळ्या किरणांची मजा घेणे, डॉल्फिन्स पाहणे किंवा किनार्‍यावरच्या वाळूत चालणे अशा अनेक गोष्टींचा आनंद पर्यटक घेऊ शकतात. मेडीटेशन (ध्यान, चिंतन) अथवा काही करण्याची आवश्यकता नाही असा शहरी बजबजाटापासून दूर शांत मी-टाईम अनुभवू शकतात.

खाद्यसंस्कृती
वेळणेश्वरला अस्सल कोकणी पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळतो. मासेप्रेमींसाठी येथे रावस, कोलंबी, पापलेट, बांगडा इत्यादी ताजे मासे; शाकाहारींसाठी पिठलं-भाकरी, वालाची उसळ, आंबोळी, घावणे, मोदक अशा खास घरगुती चवीचे पदार्थ असतात. खाण्याचे पान येथे मोठ्या प्रमाणावर आढळते आणि शेतीप्रमाणेच येथील खाद्यसंस्कृतीचा ते अविभाज्य भाग आहे.

वेळणेश्वरला कसे पोहचावे?
मुंबईपासून २८२ किमी (५ तास) तसेच पुण्यापासून ३०० किमी (५.३ तास) अंतरावर वेळणेश्वर आहे. या शहरांतील पर्यटकांना त्यामुळे बस अथवा कॅबने येणे सोयीचे जाते. सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक चिपळूण ६० किमीवर आहे. सगळ्यात जवळचा विमानतळ कोल्हापूर येथे असून तो १९१.३ किमी एवढ्या अंतरावर आहे.

हवामान
ऑक्टोबर ते मार्च हा काळ वेळणेश्वरला भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो. पावसाळ्यातही समुद्रकिनाऱ्याची वेगळी मजा अनुभवता येत असली तरी पावसाळा संपताच वेळणेश्वरचे हवामान अतिशय आल्हाददायक बनते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.