मुंबई, दि. 18 – प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे काल मुंबईत राहत्या घरी निधन झाले, ते 89 वर्षांचे होते. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना 2018 साली, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काल संध्याकाळी सरकारी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुस्तफा खान यांच्या निधानाबद्दल, शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना, “खान साहेब हे फक्त चांगले गायकच नाही, तर एक चांगले व्यक्ती सुद्धा होत.’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दुःख व्यक्त केले आहे. “भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राची महानता जगभर पोहचवणारे उस्ताद म्हणून गुलाम मुस्तफा खान यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचा महान पाईक, आणि अनेक पिढ्यांसाठीचं शास्त्रीय संगीताचे चालते बोलतं विद्यापीठच आपल्यातून निघून गेले आहे.’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान हे कलाक्षेत्रातलं राजमान्यता आणि लोकमान्यता लाभलेलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.