पुणे – बालभारतीने इयत्ता बारावीची पुस्तके वेबसाइटवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहेत. यामुळे विद्यार्थी, शिक्षक यांना ऑनलाइन वाचन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
करोना आणि लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना आहेत. लॉकडाऊन वाढला, तर आणखी काही दिवस शाळा व महाविद्यालये बंद ठेवावी लागणार हे स्पष्टच आहेत. या पाश्वभूर्मीवर शिक्षकांना इयत्ता बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बालभारतीने वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध करुन दिल्यास शिक्षकांना त्यावरुन अभ्यास करता येईल.
घरी बसून वेळेचा उपयोग होईल व अध्यापनाची चांगली तयारीही करता येईल, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी बालभारतीला आदेशही दिले होते.
त्यानुसार बालभारतीच्या वेबसाइटवर पीडीएफ स्वरुपात पुस्तके तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुस्तकांची छपाई करण्यात व ती वितरीत करण्याचा काहीचा विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यातच नवीन पुस्तकांबाबत शिक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. सध्या वेबसाइटवर काही विषयांचीच पुस्तके उपलब्ध झाली आहेत. यामुळे शिक्षकांना नक्तीच मोठा फायदा होणार आहे हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. संतोष फाजगे यांनी दिली आहे.