पुणे – इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे गुरुवारी जाहीर होणारी दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक प्रवेशासाठीच्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे अकरावीचे प्रवेश आता लांबणीवर गेले आहेत.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, आज प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. मात्र, मराठा आरक्षणाच्या निर्णयावरून अकरावी प्रवेश लांबणीवर टाकण्यात आले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून पुढील पावले उचलली जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
आरक्षणाच्या निर्णयामुळे अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्या फेरीतून विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला आहे. आता मात्र दुसरी यादी लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे आता अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
शालेय शिक्षणमंत्र्यांचे ट्विट
“मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे. पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल,’ असे ट्विट शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.