पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रश्नपेढीबरोबरच उत्तरपेढीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
करोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. एप्रिल-मेमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा होणार असून त्याबाबतचे अंतिम वेळापत्रकही जाहीर झाले आहे. सल्ल्यागार समितीच्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत.
परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव करता यावा व स्वयंअध्ययनासाठी मदत व्हावी यासाठी यंदा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रश्नसंच उपलब्ध झाले आहेत. त्याला विद्यार्थ्यांकडून प्रतिसादही मिळत आहे. इयत्ता दहावीसाठी मराठी माध्यमाचे 8, इंग्रजीचे 4, उर्दूचे 6, बारावीचे मराठी माध्यमाचे 3, इंग्रजी माध्यमाचे 8, उर्दूचे 11 याप्रमाणे विषयांचे प्रश्न उपलब्ध झाले आहेत. आणखी काही विषयांचे प्रश्नसंच लवकरच उपलब्ध होणार आहेत.
आता प्रश्नसंचसोबतच उत्तरपत्रिकाही उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. मात्र, परीक्षेसाठी महिन्याभराचा कालावधी राहिला असून एवढ्या कमी वेळात उत्तरपेढी तयार करणे शक्य होणार नाही. पुढच्या वर्षी मात्र त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील, अशी माहिती विद्या प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली.