fbpx

इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग उद्यापासून सुरू होणार

सातारा -राज्यातील शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग, वसतिगृहे, आश्रमशाळा, आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे सोमवार, दि. 23 पासून सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन जिल्ह्यातील शाळांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरणाच्या सुविधा निश्‍चित करणे. विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे. थर्मामीटर, थर्मल स्कॅनर/गन, पल्सऑक्‍सिमीटर, जंतूनाशक, साबण, पाणी यांची उपलब्धता स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) करावी. कॅलिब्रेटेड कॉन्टॅक्‍टलेस इन्फ्रारेड डिजिटल थर्मामीटर वापरावेत. विद्यार्थी वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण निश्‍चित करावे. एखाद्या शाळेत क्वारंटाइन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थलांतरित करावे. अशा शाळेचे हस्तांतरण शालेय व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे, क्वारंटाइन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्‍य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.

शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रविवार, दि. 22 पर्यंत कोविड-19 च्या आरटीपीसीआर चाचण्या करणे बंधनकारक आहे. या चाचण्यांची प्रयोगशाळांनी दिलेली प्रमाणपत्रे शाळा व्यवस्थापनास सादर करावीत आणि त्यांची पडताळणी शाळा व्यवस्थापनाने करावी. चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी डॉक्‍टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे. चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेल्यांनी शाळांमध्ये कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्‍यक आहे. वर्गखोल्या, स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी.

शारीरिक अंतराच्या अंमलबजावणीकरिता चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे. शाळेत दर्शनी भागावर मार्गदर्शक सूचनांची पोस्टर्स, स्टीकर्स प्रदर्शित करावेत. थुंकण्यावरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसराते रांगेत उभे राहण्याकरिता सहा फूट इतके शारीरिक अंतर राखले जाईल. याकरिता चौकोन, वर्तुळ इत्यादी चिन्हांचा वापर पिण्याच्या पाण्याची सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादी ठिकाणी करावा. येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्‍चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात. शाळेतील परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा व तत्सम कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध आहेत. शिक्षक-पालक बैठका ऑनलाइन घ्याव्यात.

विद्यार्थी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्‍यक असेल. आजारी असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांना घरी राहूनदेखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने योजना तयार करावी. विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांना कोविड संदर्भातील आव्हानांबाबत जागरुक करावे. अधिक उच्च धोक्‍याच्या पातळीवरील वृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व औषधोपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अधिक काळजी घेताना विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये.

शाळेतील उपस्थिती व वैद्यकीय रजा याबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करावी. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती पूर्णपणे पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व सुरक्षाविषयक इतर उपायांबाबत शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. या व्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्‍यक मार्गदर्शक सूचना निश्‍चित कराव्यात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.