पारनेर – संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणार्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजीची जयंती साजरी करत असताना सुपा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेने मुख्याध्यापकाला मारहाण केली. बापूंना अर्धवट अभिवादन करून हा प्रकार थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला. शिक्षक, पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर दोघांनीही परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या. ग्रामस्थांनी मुजोर शिक्षिकेची बदलीची मागणी केली आहे.
पहिली फिर्याद रामेश्वर काळे यांनी दिली. त्यांनी म्हटले आहे की, गांधी जयंती असल्याने मी फुल, हार घेऊन आलो. मी बापूंच्या प्रतिमेला हार घालत असताना शाळेतील एका शिक्षिकेने पाठीमागून येऊन मला दोन चार गुद्दे मारले. तेथे आमचे सहकारी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या सर्वांच्यासमोर या शिक्षिकेने मारहाण केली असल्याची फिर्याद दिली.
दुसरी फिर्याद प्रतिभा शांताराम पाचरणे यांनी दिली. रविवारी सकाळी मुख्याधापक काळे उशीरा आल्याने मी त्यांना उशीर का झाला म्हणून विचारले असता त्यांनी मला शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ऐन गांधी जयंतीच्या दिवशी शिक्षकांची भांडणे पालक व विद्यार्थ्यांसमोर झाल्याने ही बातमी काही मिनिटात गावभर व पोलिस स्टेशनपर्यंत पोहचली. ही भांडणे सुपा पोलीस स्टेशनला पोहोचले तेव्हा तेथे मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.
गांधी जयंतीच्या दिवशी शिक्षकांमध्ये भांडणे झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोठी नाराजी व्यक्त केली. यावेळी सरपंच मनिषा रोकडे, उपसरपंच दत्तात्रय पवार, माजी सरपंच विजय पवार, माजी उपसरपंच सागर मैड, विजय पवार, विलास पवार, पप्पू पवार, डॉ. डी.एन. पवार, विठ्ठल पवार, बाबासाहेब पवार, प्रदीप पवार, बाबू पवार, अतुल जाधव यांच्यासह पालक, महिला उपस्थित होते. अनेक महिला पालकांनी त्या शिक्षिकेच्या तक्रारींचा पाढाच वाचला.
“या शाळेतील शिक्षकांच्या यापूर्वीही अनेक तक्रारी आल्या असून, त्यांच्यात यापूर्वीही खूप वाद विवाद झाले आहेत. आजचे भांडण हे विद्यार्थी व पालकांसमोर झाले असून, या वादाचा विद्यार्थ्यांच्या मनावर वेगळा परिणाम होतो. आगामी ग्रामसभेमध्ये या शिक्षिकेच्या बदलीचा ठराव करून पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदला पाठवण्यात येईल व त्यांच्या बदलीची मागणी केली जाईल.”
-मनिषा रोकडे (सरपंच, सुपा)