आणीबाणीविरोधात ट्रम्प यांच्यावर कॅलिफोर्नियासह 16 राज्यांनी ठोकला दावा

कॅलिफोर्निया (अमेरिका) – आणीबाणीविरोधात अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यावर कॅलिफोर्नियासह 16 राज्यांनी दावा ठोकला आहे. डोनॉल्ड ट्रम्प यांनी मेक्‍सिको सीमेवर भिंत उभारण्यासाठी निधी घेता यावा, म्हणून देशात आणीबाणी लागू केली आहे. त्या विरोधात दावा ठोकल्याची माहिती कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल झेवियर बेसेरा यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. देशात आणीबाणी लागू करण्याची अध्यक्ष ट्रम्प यांची कृती म्हणजे घटनेचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणीबाणी लागू केल्याने कॉंग्रेसला टाळून अध्यक्ष ट्रम्प पेंटेगॉन आणि अर्थसंकल्पांमधून मेक्‍सिको भिंतीसाठी निधी उपलब्ध करून घेऊ शकतात.

अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प हे कायद्याचा बेधडक अवमान करत आहेत. देशाच्या सीमेवर कोणतेही संकट नाही, हे त्यांना माहीत आहे. आणीबाणी लागू करणे अनावश्‍यक आहे हे त्यांना माहीत आहे, आणि न्यायालयातील दावा ते हारणार आहेत हे देखील त्यांना माहीत आहे; तरीही मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्याचे दिलेले वचन पाळण्यासाठी त्यांनी आणीबाणी लागू केली आहे, असे ऍटर्नी जनरल झेवियर बेसेरा यांनी म्हटले आहे.

कॅलिफोर्नियाबरोबरच कोलोरॅडो, कनेक्‍टिकट, डेलवेअर, हवाई, इलिनॉईस, मेने, मेरिलॅंडमिशिगन, मिनिसोटा, नेवाडा, न्यू जर्सी, न्यू मेक्‍सिको, न्यूयॉर्क, ओरेगॉन अणि व्हर्जिनिया या राज्यांच्या ऍटर्नी यांचाही आणीबाणीविरोधात ट्रम्प यांच्यारील दाव्यात सहभाग आहे.

अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प हे संकट निर्माण करत आहेत, कृत्रिम आणीबाणी लागू करत आहेत आणि घटनेची अवमानना करत आहेत. ही आणीबाणी म्हणजे राष्ट्राला कलंक आहे, असे कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गेव्हिन न्यूसम यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.