2004 आणि 2019 निवडणूकीत शिक्षणाबाबत विसंगत माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप
पुणे – उत्तरप्रदेश येथील अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवीत असलेल्या केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधात मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.एन. गायकवाड यांच्या न्यायालयात यावर सुनावणी होणार 2004 आणि 2019 च्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत विसंगत माहिती देऊन फसवणूक आणि विश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
इराणी या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. इराणी यांनी 2004 साली कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या विरोधात दिल्ली येथील चांदणी चौक मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण बी.ए.पर्यंतचं शिक्षण घेतल्याचे शपथेवर प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र 2019 ची लोकसभा निवडणूक लढवत असताना त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण बी.ए.च्या प्रथमवर्षापर्यंतच शिक्षण घेतल्याचे नमूद आहे. त्यामुळे हा खटला दाखल करण्यात आला आहे. मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांनी ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत हा खटला दाखल केला. लवकर न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.