‘या’ 8 सोप्या स्टेप्समध्ये घरबसल्या काढा PF खात्यातील रक्कम

केंद्र सरकारने, कोरोनाव्हायरस (कोव्हिड-19) साथीच्या आजाराच्या धोक्‍यामुळे आलेल्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या निधीमधून (परत न करण्यायोग्य) आगाऊ रक्कम काढून घेण्यास परवानगी दिली आहे.

कामगार मंत्रालयाने मार्च महिन्यात ईपीएफ सदस्यांना त्यांच्या जमा रकमेपैकी 75 टक्के वाटा किंवा मूलभूत वेतन आणि तीन महिन्यांची महागाई भत्त्याची रक्कम (या दोन्हीपैकी जी कमी असेल ती) काढून देण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रियेची माहिती येथे आपणासाठी देत आहोत.

लक्षात घ्या की, यासाठी तुम्हाला पीएफ कार्यालयात जाण्याची अथवा कोणा एजंटाची मदत घेण्याची आवश्‍यकता नाही. ही रक्कम तुम्ही घरबसल्या तुमच्या बॅंक खात्यात मिळवू शकता, तेही अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत…

1. ईपीएफ खात्यात एकूण जमा रकमेपैकी परत न करण्यायोग्य 75 टक्के रक्कम अथवा मूलभूत वेतन आणि तीन महिन्यांची महागाई भत्त्याची रक्कम काढायची असेल तर सर्वप्रथम, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) ग्राहकाने ईपीएफ योजनेच्या पोर्टलवर लॉग इन करायचे आहे. त्याचा पत्ता असा आहे- unifiedportal-mem.epfindia.gov.in

2. एकदा लॉग इन झाल्यानंतर ग्राहकाने वेबसाइटच्या ऑनलाइन सेवा विभागात क्‍लेम फॉर्म 31 निवडावा. त्यानंतर सदर सदस्याने पीएफ खात्याशी जोडलेल्या बचत बॅंक खात्याच्या क्रमांकाचे शेवटचे चार अंक व्हेरिफाय (सत्यापित) करायचे असून त्यानंतर Proceed (“पुढे जा’) वर क्‍लिक करावे.

3. त्यानंतर एपीएफ सदस्याला Withdrawal Form दिसेल. त्या पानावर क्‍लिक करुन सदस्याने I Want to Apply (“मला अर्ज करायचा आहे”) या मजकूराच्या पुढील ड्रॉपडाऊनमधून “PF Advance’ पीएफ ऍडव्हन्स फॉर्म (अर्थात फॉर्म 31) निवडावा.

4. यापुढील चरणात, सदस्याने पैसे काढण्याचा हेतू निवडायचा आहे. नव्या तरतुदीनुसार येथे ईपीएफ पोर्टलने ड्रॉपडाउन मेनूमध्ये “महामारीचा उद्रेक (कोविड -19)” हा एक नवीन पर्याय सादर केला आहे. सदस्याने तो पर्याय निवडणे आवश्‍यक आहे.

5. पुढील चरणात, ईपीएफ ग्राहकांने त्याच्या बचत खात्यावरील एक धनादेश अर्थात चेकचे छायाचित्र अपलोड करायचे आहे, ज्यामध्ये त्याच्या बॅंक खात्याचा आयएफएससी कोड आणि खाते क्रमांक स्पष्टपणे दिसत असला पाहिजे.

6. यानंतर वापरकर्ता सदस्य सदर प्रक्रियेला मान्यता देत असल्याच्या स्व-घोषणा संदेशावर क्‍लिक करावयाचे आहे.

7. यानंतर सदस्याने त्याचा आधार कार्डचा नंबर व्हेरिफाय (सत्यापित) करावयाचा आहे. यासाठी आधार कार्ड ज्या फोन नंबरशी जोडलेले आहे, त्यावर एक ओटीपी अर्थात One Time Password पाठवला जाईल. तो दिलेल्या जागेत भरावयाचा आहे. त्यानंतर Submit या बटणावर क्‍लिक करायचे आहे.

8. एकदा विनंती केल्यानंतर ईपीएफ सदस्यांच्या पोर्टलनुसार ईपीएफ ग्राहकांच्या बचत खात्यात तीन दिवसांच्या आत हा निधी जमा केला जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.