नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीचा निर्णय रास्त ठरवला असल्याचा जो दावा केला जात आहे तो दिशाभुल करणारा आणि चुकीचा आहे अशी प्रतिक्रीया कॉंग्रेसने नोंदवली आहे. कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, नोटबंदीची उद्दीष्ठ साध्य झाली आहेत किंवा नाहीत या विषयी कोर्टाने कोणतेच मत नोंदवलेले नाही. एका न्यायाधिशाने हा निर्णय बेकायदेशीर व अनियमीत स्वरूपाचा असल्याचे म्हटले आहे. ही सरकारला मिळालेली चपराकच आहे असे पी चिदंबरम यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.
नोटबंदीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया चुकीची नव्हती असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नोटबंदीचा निर्णय 4 विरूद्ध 1 अशा मतांनी वैध ठरवला आहे. जयराम रमेश यांनी म्हटले आहे की सुप्रिम कोर्टाचा बहुतांशी निर्णय हा नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेशी संबंधीत होता. त्या निर्णयाचे फलित काय यावर कोर्टाने कोणतेही भाष्य केलेले नाही किंवा तो विषय त्यांनी विचारात घेतला नाही.
ज्या उद्दीष्ठांसाठी किंवा हेतुंसाठी नोटबंदीचा निर्णय घेतला गेला त्यातील कोणतेही उद्दीष्ठ साध्य झालेले नाही असेही जयराम रमेश यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की बाजारातील चलनी नोटांचे वाढलेले प्रमाण पहाता कॅशलेस इकॉनॉमिचा सरकारचा हेतु साध्य झालेला नाही.बनावट नोटांना आळा घालण्यात अपयश आले असून दहशतवाद आणि काळ्यापैशालाही यातून नियंत्रणात आणता आलेले नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनीही सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीच्या निर्णयाचे शहाणपण मान्य केलेले नाही असे म्हटले आहे.