नागरिक-पोलीस संघर्ष पुन्हा पेटला

विनामास्क कारवाईला विरोध : पोलिसांना मारहाण 

पुणे – शहरात करोनाबाधितांमध्ये वाढत असल्याने पोलिसांनी मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका लावला आहे. एकीकडे पोलीस आणि दुसरीकडे महापालिकेचे कर्मचारीही कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. कारमध्ये बसलेल्या नागरिकांनीही मास्क न घातल्यास त्यावरही कारवाई होत आहे. मात्र, पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईने नागरिक आणि पोलीस असा संघर्ष पेटला आहे.

 हेल्मेट सक्‍तीवरून जसा रोष पत्करावा लागला होता. तसेच वातावरण आता हळूहळू होताना दिसत आहे. पोलीस करत असलेल्या कारवाईचा नागरिकांकडून विरोध होत आहे. यातूनच वाहनचालकांकडून कारवाई करणाऱ्या पोलिसांना धक्‍काबुक्‍की व मारहाणच्या घटना घडत आहेत. मात्र, मास्क आपल्याच सुरक्षेसाठी आहे, याचे भान सुटल्याचे दिसत आहे. 

बाप-लेकांची पोलिसास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण
कारमध्ये मास्क न लावता प्रवास करणाऱ्या बाप-लेकांनी पोलीस शिपायास लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ही घटना कोरेगाव पार्क येथील सेंट मीरा बस थांब्याजवळ घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी इलियास हासीम आतिया आणि हासीम इलियास आतिया या दोघांना अटक केली. यातील हासील हा शिक्षण घेत असून त्याचे वडील उद्योगपती आहेत. पोलीस हवालदार जयवंत देवीदास भालेराव (52,बंडगार्डन वाहतूक विभाग) यांनी फिर्याद दिली. तपास अधिकारी गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई भालेराव हे विना मास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत होते.

यावेळी कारमधून विनामास्क इलियास आणि हासीम चालले होते. भालेराव यांनी त्यांची कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र त्यांनी कार थांबवली नाही. यामुळे भालेराव यांनी पाठलाग करून कार थांबवली. याचा राग आल्याने दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली.

दोन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्‍काबुक्‍की; दोघे अटकेत
दुचाकीवर विनामास्क प्रवास करणाऱ्या तरुणांविरुद्ध कारवाईच्या रागातून दोघांनी पोलिसांना धक्‍काबुक्‍की केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सातारा रस्त्यावर घडली. ऋषिकेश हनुमंत राऊत (35, रा. धनकवडी) आणि शौनिक अनिल पानसे (39, रा. सहकारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक छाया गादिलवाड यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सोमवारी गादिलवाड सहकाऱ्यांसोबत वाहनचालकांची तपासणी करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या ऋषिकेश आणि शौनिकने मास्क घातले नव्हते. त्यामुळे गादिलवाड यांनी त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. त्याचा राग आल्यामुळे त्यांनी गादिलवाड यांच्यासोबत असलेल्या पोलीस शिपाई फुंदे व चव्हाण यांना धक्‍काबुक्‍की केली. त्याशिवाय महिला पोलीस उपनिरीक्षक छाया गादिलवाड यांचे मोबाइलमध्ये छायाचित्रण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खेंगरे तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.