Embraer-Adani sign MoU: भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्र वेगाने विस्तार करीत आहे. भारतातील विमान सेवा देणार्या कंपन्यांना या विमानाची आयात करावी लागते. प्रसंगी अनेक वर्ष विमानाची वाट पहावी लागते. त्यातून मार्ग काढण्यासाठी अदानी समूहाने पुढाकार घेतला आहे. अदानी समूह आता ब्राझील मधील नागरी विमान निर्माण करणारी कंपनी एम्ब्रेअरबरोबर संयुक्त प्रकल्प निर्माण करून भारतातच या विमानांची निर्मिती करणार आहे. ही विमाने भारतात तयार झाल्यानंतर भारतातील छोट्या शहरादरम्यान विमान सेवा वाढविण्यास मदत होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयात दोन्ही कंपन्यांदरम्यान सहकार्य करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीचे संचालक जीत अदानी यांनी सांगितले की, भारतात या विमानांची निर्मिती करण्यासाठी असेंब्ली लाईन विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पात तयार होणार्या विमानांची क्षमता 150 प्रवाशांची असेल. बोईंग आणि एअर बसमध्ये प्रवाशांची क्षमता साधारणपणे 180 असते. एम्ब्रेअर कंपनीची विमाने छोटी असल्यामुळे ती भारतातील छोट्या शहरादरम्यान प्रवासी सेवा देऊ शकणार आहेत. हा प्रकल्प नेमका कुठे उभारला जाणार आहे. यामध्ये दोन्ही कंपन्या किती गुंतवणूक करणार आहेत. उत्पादन कधी सुरू होणार आहे. या संदर्भात तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. अदानी यांनी सांगितले की एक -दोन ठिकाणी जमीन पाहिली जात आहे. दोन महिन्यातच हा प्रकल्प नेमका कुठे उभा करायचा या संदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्यक्ष विमाननिर्मिती बरोबरच पायलट ट्रेनिंग, देखभाल इत्यादी सेवाही विकसित केल्या जाणार आहेत. नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिंह यांनी सांगितले की, यासाठी फक्त असेंब्ली लाईन सुरु करण्यात येणार नाही तर ब्राझीलची कंपनी तंत्रज्ञान हस्तांतरण करणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.