बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची वाताहत

महायुतीला चिंचवडमध्ये लाखभराची आघाडी
हक्‍काच्या पिंपरीनेही साथ सोडली

पिंपरी – नुकत्याच झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा घात पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघाने केल्यामुळे ज्या मतदारसंघात पक्षाची ताकद असल्याचे सांगितले जात होते, त्याच ठिकाणी राष्ट्रवादीची अक्षरश: वाताहत झाली. एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्याच बालेकिल्यात स्वकीयांसह गयारामांनीही रसद न पुरविल्याने पार्थ पवारांचा मानहानीकारक पराभव झाला. या पराभवातून राष्ट्रवादी बोध घेवून विधानसभेची तयारी करणार की पुन्हा नव्या पराभवाचा पाया रचणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा शहरातील महत्त्वाचा पक्ष. स्थापनेपासून सध्याचे काही अपवाद वगळता या शहरावर राष्ट्रवादीचे पर्यायाने अजित पवार यांचेच वर्चस्व राहिले आहे. सध्या भाजपात जाऊन विधानसभेत पोहोचलेले आणि महापालिकेतून राष्ट्रवादीला हद्दपार करून सत्ता काबीज करणारे हे एकेकाळचे अजित पवारांचेच समर्थक. गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने गळती लागली. अजित पवारांनी मोठे केलेले शिलेदार राष्ट्रवादीपासून दूर गेल्याने विधानसभेपाठोपाठ महापालिकेतही पक्षाला फटका बसला. गेल्या दोन वर्षांत राष्ट्रवादीने महापलिकेवर विरोधी पक्ष म्हणून वचक निर्माण करण्यातही यश मिळविले नाही.

अचानकपणे लोकसभा निवडणुका येताच अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच नाव पुढे करत निवडणुकीत रंगत आणली. मात्र राजकीय अनुभवाची कमतरता, आजपर्यंत कोणत्याच सामाजिक कार्यात नसलेला सहभाग आणि थेट लोकसभेसाठी रिंगणात घेतलेली उडी पवारांना अडचणीत आणणारी ठरली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मतदारांना ग्रहित धरण्याचा दुराग्रहच या पक्षाला आणि नेत्यांना अडचणीत आणणारा ठरला. पैशांचे बळ आणि नेत्यांची ताकद यावर आपण निवडणूक जिंकू हा असणारा अति आत्मविश्‍वास पार्थ यांना मानहानीकारक पराभवाकडे घेवून गेला. राष्ट्रवादीच्या विरोधात गेलेला निकाल हा येथील मतदारांनी पाठ फिरविल्यामुळे नव्हे तर राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि नेत्यांनी केलेल्या चुकांचेच द्योतक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.