पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – मंगळवार पेठेतील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा पसरल्याने शहरात दिवसभर खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून आहे.
ते तिघेही बिहारचे असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने तपासचक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
स्थानिक पोलीस आणि काही सामाजिक संस्थांनी मंगळवारी (दि.१३) कमला नेहरू रुग्णालय प्रशासनाला व्हाॅट्स अॅपवरून मेसेज आणि फोटो पाठवून रुग्णायालयत संशयित बांगलादेशी फिरत असल्याचे कळवले होते.
त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज सर्व सुरक्षा रक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना पाठविले होते. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेजमधील संशियत आणि रुग्णालयात आलेल्या तिघांमध्ये साम्य दिसत होते.
यामुळे रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांनी ही गोष्ट सुरक्षा रक्षकांनी कळवली. यानंतर या तिघांना लगेच एका खोलीत बसवून दार लावून घेण्यात आले. यावेळी त्यांना अनेक प्रश्न सुरक्षा रक्षकांकडून विचारण्यात आले.
दरम्यान ही घटना पोलिसांनी कळविण्यात आली. यातच कमला नेहरू रूग्णालयात दहशतवादी शिरल्याचे अफवा सर्वत्र पसरली.
रुग्णालयाच्या तळघराच्या वरच्या मजल्यावर तपासणीचे ओपीडी पेपर काढण्यासाठी, एक्स-रे, इतर चाचण्यांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक थांबले होते. या भागात संशयित दहशतवादी असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली होती.
रुग्णालयातील सगळ्या रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते. थोड्या वेळातच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी तिघा संशयितांना घेतले. यानंतर तिघांना फरासखाना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले होते.
हे तिघेही सध्या लोहियानगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगची तपासणी केली असता त्यात आधारकार्ड आणि एका इस्लामिक संघटनेच्या संदर्भातील कागदपत्रे आढळून आली आहे. त्या आधारकार्डवर तिघेही बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील असल्याचे उल्लेख आहे.
यानंतर काही काळ रुग्णालय बंद ठेवण्यात आले होते. पोलिसांनी सर्व रुग्णालयाची पाहणी करून काही धोका नसल्याचे लक्षात आले असता ते पुन्हा सुरु करण्यात आले.
फुटेज आणि संशयितांत साम्य
याबाबत बोलतांना कमला नेहरू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत बोटे यांनी सांगितले की, दि. १३ ऑगस्टच्या सकाळी हे संशयित तिघे रुग्णालयात आले होते. त्यांनी फॉर्म भरून रक्तचाचणी केली होती. त्यानंतर ते निघून गेले.
दरम्यान, रात्री साडेआठ वाजता स्थानिक पोलिसांनी काही फोटो पाठवून “संशयित बांगलादेशी रुग्णालय परिसरात फिरत असून या संदर्भात काही समजल्यास पोलिसांना कळवावे,’ असे सांगितले होते.
यामुळे सीसीटीव्ही तपासण्यात आले. पोलिसांनी पाठविलेले फोटो आणि सीसीटीव्हतील संशयित यांच्यात साम्य होते. यामुळे फोटो आणि फुटेज कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले. या तिघा संशयितांची सर्व माहिती घेण्यात आली. बुधवारी त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल देण्यात येणार होता. दरम्यान, बुधवारी सकाळी तिघेही रुग्णालयात आले. ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांकडून सखोल तपास
पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल म्हणाले, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयितांची चौकशी केली. त्यांच्याकडील आधारकार्ड आणि इतर कागपत्रांचे पडताळणी करण्यात येत आहे. त्यांच्या आधार कार्डवरील पत्त्याचा तपास केला जात आहे.
ते किती दिवसांपासून पुणे शहरात आहेत आणि कुठल्या कामासाठी आले होते, याची सुद्धा चौकशी केली जात आहे. बिहारमधील तपास यंत्रणांशी पुणे पोलीस संपर्कात आहेत. त्यांच्याजवळ असणाऱ्या बॅगमध्ये कागदपत्रे आढळून आली आहेत. प्राथमिक तपासात ते एका संस्थेसाठी वर्गणी गोळा करायला आल्याचे समजते. यासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे