अहिल्यानगर – बस प्रवासात महिलेची पर्स एका महिलेने चोरून नेली. त्यात तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व तीन हजारांची रोकड होती. नाशिक ते अहिल्यानगर बस प्रवासादरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली हरिभाऊ कपाळे (वय 43 रा. मखबलाबाद शांतीनगर, स्वास्तिक रेसिडेनिन्सी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांची मुलगी माहेरी अहिल्यानगर येथे येण्यासाठी नाशिक येथून मंगळवारी सकाळी आठ वाजता नाशिक ते अकलूज या बसमध्ये बसल्या होत्या. दुपारी पावणे बाराच्या सुमारास बस राहुरी येथे आल्यानंतर तेथून तीन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. त्यातील एक महिला फिर्यादीच्या शेजारी येऊन बसली. दुपारी साडेबारा वाजता बस अहिल्यानगर शहरातील सावेडी नाका येथे आली असता फिर्यादी व त्यांची मुलगी बसमधून खाली उतरली.
त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेली महिला देखील तेथे उतरली. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्याकडील पर्स पाहिली असता त्यांना पर्स दिसली नाही. त्यांनी बसमध्ये जावून पाहिले असता तेथे देखील पर्स मिळून आली नाही. त्यांच्यासोबत बसमधून उतरलेली महिला मात्र रिक्षातून निघून गेली. त्या महिलेने फिर्यादीची पर्स व त्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि तीन हजारांची रोकड चोरून नेली असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश शिंदे करत आहेत.