शहर सहकारी बॅंकेत 40 कोटींचा कर्जघोटाळा

बॅंकेच्या संचालकांसह डॉ. नीलेश शेळकेंविरोधात गुन्हा; आरोपींत अनेक प्रतिष्ठित

नगर – अहमदनगर इन्स्ट्टिूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) साधी शहरातील डॉक्‍टरांकडून कोट्यवधी रुपये घेतले, तसेच हॉस्पिटलमध्ये भागीदारी देण्याचे सांगून त्यांच्या नावावर शहर सहकारी बॅंकेत 40 कोटींचा कर्जघोटाळा केला. या प्रकरणी आज शहर पोलिस ठाण्यात तीन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. शहर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्यासह सर्व संचालक, डॉ. नीलेश शेळके यांच्यासह अन्य अनेक प्रतिष्ठितांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे बॅंकिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुरीच्या डॉ. रोहिणी सिनारे व त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे, की नगरमधील एम्स हॉस्पिटलची उभारणी करण्यासाठी डॉ. शेळके यांनी आमचा विश्‍वास संपादन केला. गुंतवणूक करून त्याच्या नफ्याची वाटणी कशी करायची, हे ठरले. सुरुवातीला वीस जणांनी एम्ससाठी जागा घेतली. नंतर त्यातून डॉ. खालकर, डॉ. अग्रवाल व डॉ. पंडित यांची नावे वगळण्यात आली. डॉ. शेळके, डॉ. शशांक मोहळे, डॉ. अरुण सोनवणे, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे आदी सहा जणांनी सुरुवातीला प्रत्येकी 15 लाख रुपये गुंतवून हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात केली. शहर सहकारी बॅंकेने साडेसात कोटी रुपयांचे अर्थसाह्य केले. त्यासाठी फर्मच्या नावे कर्ज काढण्याऐवजी व्यक्तिगत नावाने कर्ज काढण्यास डॉ. शेळके यांनी भाग पाडले. त्यासाठी भूखंड गहाणखत करण्याची तयारी त्यांनी दाखविली.

शहर सहकारी बॅंकेच्या कर्जप्रकरणावर डॉक्‍टरांच्या सह्या घेण्यात आल्या. त्या वेळी कोणत्या कागदपत्रावर आपण सह्या करतो आहोत, हे संबंधित डॉक्‍टरांनी डॉ. शेळके व शहर सहकारी बॅंकेच्या संचालकांनी दिलेल्या विश्‍वासामुळे पाहिलेच नाही. डॉ. शेळके यांच्या पत्नीच्या आत्महत्येमुळे हॉस्पिटलची उभारणी तसेच यंत्रसामुग्री खरेदी लांबणीवर पडली. कर्ज मात्र मंजूर झाले होते. डॉ. रोहिणी यांच्या एकटीच्या नावाने पाच कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. कोणतीही संमती न घेता व्यक्तिगत कर्ज कसे मंजूर झाले, याची विचारणा केली असता बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी डॉ. शेळके यांच्याकडे बोट दाखविले. त्यांच्या सांगण्यानुसार कर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. बॅंकेचे संस्थापक प्रा. मुकुंद घैसास यांच्याकडे कर्जप्रकरणाची माहिती मागवूनही ती दिली नाही. त्यानंतर तक्रार केली असता, डॉ. शेळके यांनी कर्जाचे हप्ते भरण्यास सुरुवात केल्याने तुम्हाला त्रास होणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले, असे डॉ रोहिणी यांनी म्हटले आहे. याबाबत डॉ. रोहिणी व अन्य डॉक्‍टरांनी सहकार आयुक्त, रिझर्व्ह बॅंक, जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती.

डॉ. कवडे यांच्या पत्नी डॉ. उज्जला यांनीही फिर्याद दिली आहे. त्यातही एम्स हॉस्पिटलमध्ये शहरातील डॉक्‍टर व अन्य व्यावसायिकांनी पाच-सहा कोटींची गुंतवणूक केली, तर शहर सहकारी बॅंकेचे साडेसात कोटींचे कर्ज काढल्याचे म्हटले आहे. उज्ज्वला यांच्या नावावरही पावणेसहा कोटी रुपयांचे कर्ज काढले. एकाच्या नावाचे काढलेले कर्ज दुसऱ्याच एजन्सींनी वटविण्याचे प्रकार येथे घडले. डॉ. शेळके यांना फायदा होण्यासाठी बॅंकेचे संचालक व अधिकारी वागले, असा त्यांचा आरोप आहे. डॉ. विनोद श्रीखंडे यांनीही अशीच फिर्याद दिली आहे. डॉ. श्रीखंडे व डॉ. शेळके हे पुण्यापासूनचे मित्र आहे. हॉस्पिटल, सिटी स्कॅन, एमआरआय मशिनरीच्या नावाखाली कर्ज काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. साईकृपा मेडिकल फौंडेशनच्या नावाने परस्पर पावणेसहा कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचे त्यात नमूद केले आहे. डॉ. शेळके अगोदरच थकबाकीदार असताना ही सर्व कर्जे संगनमताने करण्यात आल्याचे तसेच अन्य एजन्सीचे नाव वापरल्याचे त्यात म्हटले आहे.

आरोपींची नावे

मुकुंद घैसास (मयत), अशोक कानडे, सुनील फळे, डॉ. रावसाहेब अनभुले (मयत), सुभाष गुंदेचा, सतीश अडगटला, मच्छिंद्र क्षेत्रे, संजय घुले, गिरीश घैसास, डॉ. विजयकुमार भंडारी, सुजीत बेडेकर, शिवाजी कदम, लक्ष्मण वाडेकर (मयत), रेश्‍मा आठरे, नीलिमा पोतदार, बाळासाहेब राऊत, संजय मुळे, जवाहर कटारिया, दिनकर कुलकर्णी, विजयकुमार मर्दा, बी. पी. भागवत, योगेश मालपाणी, जगदीश कदम, आर. टी. कराचीवाला, मधुकर वाघमारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)