जळोची – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील अवैद्य हातभट्टी दारू बंद करण्याच्या सूचना पोलीस खात्याला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दोन दिवसांपूर्वी बारामती शहर पोलीस ठाण्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे समुपदेशन केले होते. तसेच ज्यांना कुणाला काम पाहिजे असल्यास एमआयडीसी येथे संपर्क करून काम देण्याचे आश्वासनही दिले होते. तसेच यापुढे कुणीही अवैध दारू विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर गंभीर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला होता.
असा इशारा देऊन सुद्धा तेजस राजपूत अहिवळे (वय.३५,वर्ष रा.सुहासनगर अमराई) हा अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री करत असताना मिळून आला. त्याच्या ताब्यात दहा लिटर गावठी हातभट्टी दारू पोलिसांना मिळाली. सदरची गावठी हातभट्टी दारू ही शरीरास अपायकारक आहे. आणि एक प्रकारचे विष आहे. त्यामुळे यापुढे कोणीही गावठी हातभट्टी दारू विक्री करताना मिळाल्यास त्याच्यावर याच कलमाप्रमाणे कारवाई होणार आहे. त्यामुळे दारू विक्रेत्याला तात्काळ जामीन होणार नाहीत. त्याचा मुक्काम काही दिवस जेलमध्येच असणार आहे. तसेच त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा होणार आहे, असे पोलीसांकडुन सांगण्यात आले आहे. सदरची कारवाई बारामती शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.