ईद आणि अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना
पिंपरी – अयोध्या येथील वादग्रस्त जागेचा निकाल लवकरच लागणार आहे. निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी (दि. 5) याबाबतचे आदेश दिले आहेत.
अयोध्या येथील राम मंदिर आणि बाबरी मस्जिद यांच्यातील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या जागेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. कोणाच्याही बाजूने निकाल आला तरी कोणीही त्याबाबत निषेध सभा किंवा आनंदोत्सव साजरा करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचसोबत पोलिसांनी आपल्या हद्दीत दररोज कोम्बिग ऑपरेशन तसेच रुट मार्च सुरू केला आहे. पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाचे तीन प्लाटून देण्यात आले आहेत. कोम्बिग ऑपरेशनमध्ये हाणामारीतील गुन्हेगार तसेच जातीय दंगलीच्यावेळी सक्रिय सहभागी झालेल्या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी लोकसभा व विधानसभा निवडणूकीनंतर पुन्हा एका प्रतिबंधात्मक कारवाईला सुरवात केली आहे.
पोलिसांची करडी नजर
यापूर्वी हिंदू-मुस्लिम दोन गटात झालेल्या हाणामारीतील आरोपींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 2014 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची सोशल मीडियावरून झालेल्या बदनामीनंतर शहराच्या विविध भागात पडसाद उमटले होते. विशेषत चिंचवडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बस फोडण्यात आल्या होत्या. या गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरात हिंदुत्ववादी संघटना कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर आणि सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. मुस्लिम धर्मियांच्या संघटना जरी शहरात कार्यरत नसल्या तरी मुस्लिम बहुल परिसरात विविध ग्रुप आहेत. या ग्रुपवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.
सध्या महत्वाची धार्मिक स्थळे व महापुरूषांचे पुतळे याकडेही पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. दररोज सकाळी पोलिस ठाण्यातील गुड मॉर्निंग पथक या पुतळ्यांची व धार्मिक स्थळांची पाहणी करणार आहेत. पोलीस ठाणे आणि चौकी स्तरावर शांतता समितीच्या बैठका घेण्यात येत आहेत. रविवारी (दि. 10) मुस्लिम बांधवांचा ‘ईद ए मिलाद’ सण साजरा होणार आहे. मंगळवारी (दि. 12) गुरुनानक जयंती आहे. या काळातही शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. नुकतेच पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी तातडीची बैठक घेऊन याबाबत सूचना केल्या.
महिनाभर पोलीस राहणार अधिक सतर्क
अयोध्या येथील वादग्रस्त जागेचा निकाल जरी येत्या काही कालावधीत लागणार असला तरी पुढील महिनाभर पोलीस अशाच प्रकारे सतर्क असणार आहे. कारण 6 डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली. हिंदुत्ववादी संघटना या दिवशी शौर्यदिन म्हणून साजरा करतात. तर मुस्लिम समाज काळा दिवस पाळतात. यामुळे आगामी 6 डिसेंबरपर्यंत पोलीस जातीय तणावाबाबत सतर्क राहणार आहेत.