अहिल्यानगर -दुचाकीसह डिक्कीत ठेवलेले पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने, 12 हजारांची रोकड, असा तीन लाख 32 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. मनमाड रस्त्यावरील प्रेमदान चौकातील कोहिनूर मॉलसमोर मंगळवारी रात्री ही घटना घडली.
रोनक जितेंद्र शाह (वय 33 रा. गुरूगणेश अपार्टमेंट, माळीवाडा) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी खासगी नोकरी करतात. त्यांचे नातेवाईक संगीता दिलीप चौरडीयायांच्या नावावर असलेली एक्टिव्हा मोपेड दुचाकी (एमएच 16 एआर 3519) ते वापरतात.
मंगळवारी त्यांचे वडील जितेंद्र व आई नेत्रा कोहिनूर मॉल येथे सिनेमा पाहण्याकरीता गेल्या. फिर्यादी व त्यांची पत्नी निरूपमा दुचाकी घेऊन खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी झाल्यानंतर ते दोघे आई-वडिलांना घेण्यासाठी रात्री साडेसातच्या सुमारास कोहिनूर मॉल येथे गेले. त्यांनी दुचाकी कोहिनूर मॉलसमोर पार्क करून लॉक केली.
दुचाकीच्या डिक्कीत खरेदी केलेले कपडे, पर्स व त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कानातले कुडके, हातातील कडे असे पाच तोळ्याचे दागिने, 12 हजाराची रोकड असा ऐवज ठेवला होता. ते सव्वा आठच्या सुमारास दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. दुचाकीसह त्यातील दागिने, रोकड चोरीला गेल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली.