पिंपरी -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजन समितीच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने आपला किल्ला अभेद्य ठेवला. भाजपाचे सर्व सहा उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे “राम-लक्ष्मण’ जोडीचा शहराच्या राजकारणात करिष्मा कायम असल्याचे भारतीय जनता पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
भाजपाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 9 जागांसाठी भाजपाचे सहा उमेदवार रिंगणात होते. सभागृहनेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, निर्मला गायकवाड, वसंत बोराटे, जयश्री गावडे यांनी बाजी मारली आहे.
महापालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना सत्ताधारी भाजपामधील सुमारे 25 ते 30 नाराज नगरसेवक बाहेर पडणार आहेत, अशी चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या निवडणुकीत भाजपातील नाराज बंडखोरी करीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करतील, असा अंदाज वर्तवला जात होता.
मात्र, सर्व अंदाज फोल ठरवित भाजपाचे दोन्ही नेते शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेतील वर्चस्व कायम ठेवले आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या “कमिटमेंट’चे वर्तुळ पूर्ण
भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी 2017 मध्ये महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर आपल्या सर्व समर्थकांना विविध पदांवर संधी दिली आहे. मात्र, नगरसेवक वसंत बोराटे आणि नगरसेविका निर्मला गायकवाड यांना महत्त्वाचे पद दिले नव्हते. त्यामुळे बोराटे व गायकवाड नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी शेवटच्या टप्प्यात आपल्या दोन्ही समर्थक नगरसेवकांना थेट पुणे जिल्ह्यासाठी काम करणाऱ्या नियोजन समितीवर काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली.