शहर बॅंकेच्या संचालकांना नोटिसा

सभा संपात आर्थिक गुन्हे शाखेचे कारवाई; संचालक मंडळ आज चौकशीसाठी अधीक्षक कार्यालयात

कर्जापोटी 50 कोटीच्या मिळकती गहाण

कर्ज घोटाळा हा 17 कोटी रुपयांचा आहे. या कर्जापोटी कर्जदार आणि जामिनदार अशांकडून सुमारे 50 कोटी रुपयांच्या 105 मिळकती गहाणखत करून जप्त केल्याची माहिती सीए गिरीश घैसास यांनी दिली. याच मिळकतींवर टाच येत असल्याने बॅंकेविरोधात खोटी फिर्याद दिल्याचेही त्यांनी सांगितले.

नगर – शहर सहकारी बॅंकेची सर्वसाधरण वार्षिक सभा होताच, जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने संचालक मंडळांना नोटिसा बजावून उद्या शनिवारी चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे. या नोटिसांमुळे संचालक मंडळ चांगलेच अडचणीत आले आहे. दरम्यान, सभेत बॅंकेविरुद्ध खोटी फिर्याद दिल्याचा निषेध करत तक्रारदारांविरोधात कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संचालक मंडळाने सभेच्या सुरूवातीलाच कर्ज घोटाळ्याचा खुलासा सादर केला. मात्र सभेत जुन्या जाणकार सभासदांनी संचालक मंडळाच्या कर्ज घोटाळ्यावर शालजोडे ओढत नाराजी व्यक्त केली. सभेसाठी सभागृहापेक्षा बाहेर मिठाई घेण्यासाठी सभासदांनी गर्दी केली होती. मिठाईचा बॉक्‍स मिळताच सभासद बाहेरच्या बाहेर निघत होते. सभासदांच्या तोंडात फक्त कर्ज घोटाळ्याचा विषय होता. बॅंक वाचली पाहिजे, असे काही जणांनी बोलवून दाखविले.

कर्ज घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर शहर सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज माऊली सभागृहात झाली. सभा सुरू होताच बॅंकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी कर्ज घोटाळ्याचा खुलासा केला. कर्ज घोटाळ्यात दाखल झालेल्या तिन्ही फिर्यादी खोट्या आहेत. जामिनदाराची मिळकती जप्त करण्याचा सहकार न्यायालयाचा आदेश आहे. त्यावर कार्यवाही सुरू केल्याने या तिघांनी खोट्या फिर्यादी दाखल केल्या आहेत. बॅंकेतील ठेवी सुरक्षित आहेत. बॅंकेची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. सभासदांच्या हितापलीकडे बॅंकेने आणि संचालक मंडळाने काहीही पाहिलेले नाही, असा दावा त्यांनी केला. सभेसमोर ठेवलेले सर्व विषय मंजूर करण्यात आले. यानंतर सभासदांनी म्हणणे मांडण्यास सुरूवात केली. व्यासपीठावर जाऊन माईकसमोर सभासद विषय मांडत होते.

बॅंकेच्या कर्ज वाटपाच्या पद्धतीची काही सभासदांनी चांगलीच चिरफाड केली. एनपीएमध्ये गेलेल्या कर्जाची कारणे शोधा. यामागे असलेल्या बडे मासे कोण त्याची यादीच जाहीर करा, अशी काहींनी मागणी केली. ठेवीवर व्याज वाढवा. सभासदांसाठी कर्जावरील व्याज कमी करा. वैद्यकीय आजारांच्या मदतीमध्ये वाढ करा. सभासदांना विमा संरक्षण द्या, अशी मागणी केली. उबेद शेख यांनी सभासदांचा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास असल्याचे सांगितले. बॅंकेची बदनामी होईल, तिचे नुकसान होईल, हे आम्ही खपवून घेणार नाही.

संचालक मंडळ चांगली कामगिरी करत आहे. बॅंक वाचविण्यासाठी संचालकांबरोबर आहोत. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असे सांगून त्यांनी बॅंकेविरोधात खोटी तक्रार देऊन बदनामी करणाऱ्यांविरोधात संचालक मंडळांला कारवाईचे संपूर्ण अधिकारी देण्याचा ठराव सभागृहासमोर मांडला. या ठरावाला सभागृहातील काहिंनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. संजय सपकाळ, प्रा. माणिकराव विधाते यांनीही मनोगत व्यक्त केले.

यानंतर एका जुन्या जाणकार सभासदाने बॅंकेच्या अहवालातील ताळेबंदच्या आकडेवारीची चिरफाड करत कर्ज घोटाळ्यावर संचालक मंडळाने कारवाई करून सभासदांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. कर्ज घोटाळ्यातील नावे प्रत्येक शाखेत लावावीत, अशी मागणी त्यांनी सुरूवातीला मांडली. पेपरलेस, नेटबॅकिंगच्या कारभारात स्टेशनरी व झेरॉक्‍सवरचा आडमाप खर्च कमी करावा, अशी सूचना मांडली.

सेवक व त्यांच्या पगारावरील खर्च आणि कार्यकारी मंडळाच्या बैठका आणि सभेच्या खर्चाचा हिशोब सविस्तरपणे देणे गरजेचा असल्याचेही त्यांनी सांगितले. संचालक मंडळाने सारवासारव करत सभा शांततेत पार पडली खरी. परंतु सभेनंतर लगेचच जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने संचालक मंडळाला चौकशीच्या नोटिसा बजावल्या आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी योग्य ती कागदपत्रे घेऊन उद्या शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे त्यात म्हटले आहे. या नोटिसांमुळे संचालक मंडळ चांगलेच अडचणीत आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)