नगर – नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटींच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका अधिकार्याला अटक केली आहे. राजेंद्र केशव डोळे (वय ६०, रा. अर्चना अपार्टमेंट, गुरुवार पेठ सातारा) असे या अधिकार्याचे नाव आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, डोळे याला न्यायालयात हजर केले असता न्यालयाने त्याला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजेंद्र केशव डोळे हा नगर अर्बन बँकेचा सहाय्यक मुख्य व्यवस्थापक या पदावर कार्यरत होता. अपहार कालावधीत बॅंकेचे कर्ज अर्ज छाननी विभागाचे सहायक प्रमुख व्यवस्थापक या जबाबदार पदावर काम करत असताना अपहाराशी संबंधित पुष्पराज ट्रेडिंग, एस.एस. साई डेव्हलपर्स, मे. तुकाराम एखंडे, सुरेश इंटरप्रायजेस, यशवंत वास्तू, नागेश प्राॅपर्टीज व इतर या कर्जदारांची कुवत नसतांना तसेच कर्जास पुरेपुर तारण नसताना सदर कर्ज प्रकरणांना शिफारस देवून सदर अपहार केला आहे.
तसेच गुन्ह्यातील आरोपी शितल शिवदास गायकवाड हिचे नावे असलेले जिजाई मिल्क प्रॉडक्ट या फर्मचे नावे नगर अर्बन बँकेतून बिगर सहीचे व वाढीव मूल्यांकन नमूद असलेले बनावट व्हॅल्युएशन रिपोर्टचे आधारे राजेंद्र डोळे याने मुख्य कार्यालयात तयार केलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर कर्जखात्यावर एकूण १५ कोटी ९३ लाख ७५ हजार ११० रुपये येणे बाकी आहे. बेकायदेशीर कर्ज मंजुर करण्याप्रकरणी आरोपीस आणखी कोणी मदत केली याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असून न्यायालयाने ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात कर्ज फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती हे करत आहेत.