नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लगलेल्या आणि इशान्य भारतात हिंसाचारचा भडका उडण्यास निमित्त ठरलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक 117 विरूध्द 92 मतांनी मंजूर करण्यात आले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेपाठोपाठ बुधवारी राज्यसभेत हे विधेयक मांडले. या विधेयकावर राज्यसभेत आठ तासाहून अधिक वेळ घणाघाती चर्चा झाली. या विधेयकावर मतदान प्रक्रिया रात्री आठनंतर सुरू करण्यात आली. आधी चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्यासाठी मतदान घेण्यात आले आणि बहुमताने राज्यसभेने ही मागणी फेटाळून लावली. हे विधेयक समीक्षा समितीकडे पाठवण्याच्या विरोधात 124 मते पडली तर बाजूने 92 मते पडली. शिवसेनेने यावेळी सभात्याग केला. त्यानंतर विधेयकांवरील 14 सूचनांवर मतदान घेण्यात आलं आणि नंतर विधेयकावर अंतिम मतदान घेण्यात आलं.

शहा यांनी यावेळी शिवसेनेलाही टोला लगावला. ‘सत्तेसाठी लोक कशाप्रकारे रंग बदलतात ते पाहा’ असा टोला शहा यांनी शिवसेनेला लगावला. सोमवारी लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिला आणि आज मात्र शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे एका रात्रीत हा बदल कसा झाला याचं उत्तर मलाच नव्हे तर महाराष्ट्राला शिवसेनेने द्यायला हवे, असे आव्हान शहा यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.