गल्लीबोळात सुरू आहे ‘बोली भिशी’

चक्रव्यूहात अडकताहेत नागरिक; पोलीस मात्र अनभिज्ञ

पिंपरी – व्यापारी वर्ग, संघटित, असंघटित कामगार, छोटे मोठे धंदेवाईक बेकायदेशीर “बोली भिशी’च्या चक्रव्यूहात अडकले आहेत. आर्थिक उलाढालीचे चांगलेच अड्डे बनलेल्या या “बोली भिशी’मुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडल्याने ते उद्‌ध्वस्त होऊ लागले आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, विधायक चळवळीचा समृद्ध वारसा लाभलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील गल्लीबोळात “बोली भिशी’चे अड्डेच्या अड्डे निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र या “बोली भिशीं’बाबत पोलीस अनाभिज्ञ आहेत.

व्यापारात सतत खेळतं भांडवल राहावे. व्यवसाय वाढीसाठी किंवा बचतीसाठी, सणासुदीला मनाजोगी खरेदी करता यावी, अशा व्यापारी दृष्टीकोनातून व्यापारी आपापल्या ठिकाणी बोली भिशी लावतात. काहीजण तर एक नाही, तर दोन चार ठिकाणी भिशी लावतात. अव्वाच्या सव्वा दराने एका मागून एक बोली बोलून भिशी उचलण्याचे बेकायदेशीर प्रकार खुलेआम चालत आहेत. यामध्ये परत फेडीची गॅरंटी, पात्रतेचा विचारदेखील केला जात नाही. येथेच काही जण आर्थिक चक्रव्यूहात सहजगत्या अडकले जातात. मग हप्ते फेडण्यासाठी आणखी एखाद्या भिशीचा शोध सुरू होतो. अख्खे कुटुंबच केव्हा भिशीने उद्धवस्त होते तेव्हा कळत देखील नाही.

गल्लोगल्ली सुरू असलेल्या बोली भिशीची रक्कम किमान एक लाख रुपयांपासून ते दहा लाख रूपयापर्यंत आहे. यात काही जण दोन तीन भिशी एकाच नावाच्या टाकतात. त्यामुळे तीन वेळा त्यांना भिसी उचलण्याची संधी तर मिळते. पण हफ्ते फेडण्यासाठी त्याच्यावरही साहजिकच दडपणही येते. काही बोली भिशीमध्ये हफ्ते वेळेवर न देणाऱ्यांना मोठा दंड व्याज म्हणून लावला जातो. हफ्ते फेडतांना नाकेनऊ येत असतानाच व्याज वाढत जाते.

तीन भिशीच्या नंबरमुळे एका नाही तर तीन ठिकाणी याचा सामना करावा लागतो. एरव्ही बॅंकेकडून कर्ज काढणे जिकिरीचे. कागद पत्राची जुळवाजुळव, भरमसाठ व्याजदर असतो. यामुळे अनेक व्यापारी “बोली भिशी’ला पसंती देतात. पण, बेकायदेशीर चालणाऱ्या सर्वक्षेत्रातील बोली भिशीवर कुणाचेही नियंत्रण नाही. या बोली भिशीतून अनेक धक्कादायक बाबी घडत आहेत. मात्र, त्या दडपल्या जात आहेत. यावर वेळीच नियंत्रण घालण्याची मागणी केली
जात आहे.

कमिशन अन्‌ जंगी पार्टी…
“बोली भिशी’ची जबाबदारी भिशीतील कुणीतरी तरी एक दोन सदस्य घेतात. भिशीमध्ये वीस ते चाळीस सदस्य असतात. ही संख्या कमी अधिक होऊ शकते. सदस्यांचे हफ्ते जमा करणे. ज्यांनी भिशी घेतली त्यांना रक्कम वेळेत देणे या कामासाठी त्यांना ठराविक कमिशन दिले जाते. एवढचे नाही तर एखादी जोरदार पार्टी अथवा टूर अरेंज करण्यासाठीची रक्कमही बोली भिशीच्या रकमेतून काढली जाते. काही ठिकाणी पहिली भिशी कोणतीही बोली न लावता भिशी स्थापन करणाऱ्याला “बॉस भिशी’ म्हणून दिली जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.