सातारा रस्त्यावरील स्थिती : पदपथाची अपुरी कामे, अनधिकृत हातगाडे ; अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
पुणे – पदपथाची अपुरी कामे, विक्रेत्यांची मालवाहतूक करणारी वाहने, पदपथावरील अनधिकृत पार्किंग, पादचारी मार्गावर लावलेले हातगाडे, रस्त्यावर पडलेले खड्डे या अडथळ्यांमुळे सातारा रस्ता वाहतूक कोंडीत अडकला आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या सुमारास या कोंडीतून मार्ग काढताना नागरिक हैराण होत आहेत. या कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील मुख्य मार्ग म्हणून सातारा रस्त्याची ओळख आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानके, रेल्वे स्थानक, शिवाजीनगर आदी ठिकाणांहून सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात जाणाऱ्या एस.टी बस व खासगी वाहने या रस्त्याचा वापर करतात. मात्र, सातारा रस्ता अतिक्रमणांच्या कोंडीत अडकल्याने वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर बालाजीनगर येथे अनेक विक्रेत्यांनी अनधिकृत अतिक्रमणे केली आहेत. काही विक्रेते वाहनांना अडथळा ठरतील अशी दुकाने रस्त्यावर लावत आहेत. या विक्रेत्यांवर कारवाईची गरज आहे.
उड्डाणपूल बांधूनही कोंडीचे दुखणे कायम
काही महिन्यांपूर्वी कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्यात आले; परंतु दुकानदारांच्या मुजोरीमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली नाही. कात्रज चौकात येणाऱ्या कोंढवा रस्त्यावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पद्मावती, के.के. मार्केट, बालाजीनगर चौक ते भारती विद्यापीठ या अंतरावरील सातारा रस्त्यावर अनेक ठिकाणी नो पार्किंग आहे; परंतु येथे अनधिकृत वाहने लावली जातात. के. के. मार्केट परिसरातील वाहनांच्या शोरूममधील विक्रेते वाहने रस्त्यावरच पार्किंग करतात.