वाघोली (प्रतिनिधी) : बदलापूर, पुणे तसेच महाराष्ट्रातील माता भगिनींवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ वाघोलीत बुधवारी (दि.२१) सायंकाळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिकांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या निषेधार्थ नागरिकांनी घोषणा दिल्या. बदलापूर घटनेतील ‘नराधम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी’, नको आम्हाला भिक्षा हवी सुरक्षा’ अशा घोषणा देत सरकाचा निषेध व्यक्त करून तलाठी ऑफीस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोबाईलचा टॉर्च लावत पायी मोर्चा काढला.
काय आहे नेमके बदलापूर प्रकरण?
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाकडून अत्याचार करण्यात आला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. १२ ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर १३ ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला.
या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी १२ तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करण्यात आली होती.