इंदापूर (प्रतिनिधी) : कुरवली (ता. इंदापूर) येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन (भाऊ) पाटील यांच्या गुरुवारी (दि. 25) सकाळी 8 वाजलेपासून कर्मयोगी शंकररावजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित सुसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी पाऊस असूनही मोठी गर्दी केली होती. त्यामुळे विद्यालय परिसर हा नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांची सार्वजनिक कामे, विविध प्रश्न, अडी अडचणी जागेवरतीच संबंधितांशी दूरध्वनीवरून संपर्क करून मार्गी लावल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार व मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो, बावडा येथील रत्नाई निवासस्थानी तसेच दुधगंगा दूध संघ या ठिकाणी वेळोवेळी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या सुसंवाद कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त परिसर लाभला आहे. कुरवली येथील सुसंवाद कार्यक्रमास सणसर-लासुर्णे, कळंब-वालचंदनगर या जिल्हा परिषद गटातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
हर्षवर्धन पाटील यांचा सुसंवाद कार्यक्रम हा गेली तीस वर्षांपासून प्रत्येक आठवड्याला सुरू आहे त्यातून जनतेशी संवाद होतो, त्यांचे प्रश्न मार्गी लागले जातात तसेच नवीन प्रश्नही समजतात. नागरिकांना इंदापूरला भेटायला येण्यासाठी अंतर जास्त पडते, त्यांचा वेळ जातो, त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी तालुक्यात वेगवेगळ्या भागात जाऊन सुसंवाद कार्यक्रम घेत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.