दिवसाकाठी 35 ते 40 जुन्या सदनिकांची खरेदी-विक्री
पिंपरी – मागील वर्षभरापासून संपूर्ण देशामध्ये विविध क्षेत्रात आलेल्या जागतिक मंदीमुळे उद्योग आणि व्यापार क्षेत्राला मोठा फटका सहन करावा लागत आहे. वाहन उद्योग, बांधकाम क्षेत्रामधील व्यावसायामध्येतर मंदीची तीव्रता प्रकर्षाने जावणत आहे. विशेषत: बांधकाम व्यवसाय गेल्या काही वर्षांपासूनच मंदीच्या झळा सोसत आहेत. नव्या घरांची विक्री मंदावली असली तरी जुन्या तयार घरे व सदनिकांच्या विक्रीत मात्र घट झालेली दिसून येत नाही. मंदीच्या काळातही शहरातील जुन्या फ्लॅट व घरांची खरेदी-विक्री जोमाने सुरु असून शहरामध्ये दिवसाकाठी दररोज 35 ते 40 जुन्या फ्लॅटची विक्री होत असून यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.
दुय्यम निंबधक कार्यालयात या फ्लॅट किंवा घराची खरेदी-विक्रीची नोंदणी केली जाते. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण सात दुय्यम निंबधक कार्यालय आहेत. यामध्ये भोसरी येथे 1, दापोडी येथे 2, पिंपरीत 2, चिंचवड व आकुर्डीमध्ये प्रत्येकी एक दुय्यम निबंधक कार्यालय आहे. या कार्यालयात दिवसाकाठी 5 ते 6 जुन्या घर, फ्लॅट खरेदी-विक्रीची नोंद होत आहे.
उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा मागील काही वर्षामध्ये झपाट्याने विकास झाला.
औद्योगिक वसाहतीबरोबरच आयटी कंपन्यानीही आपले बस्तान बसवल्यामुळे शहरात रोजगाराच्या शोधामध्ये वास्तव्यास आलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अल्पावधीतच पिंपरी-चिंचवड व परिसरातील जागांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले.
बाहेरुन आलेल्या लोंकाना पिंपरी-चिंचवड शहरात स्वमालकीचे घर असावे, अशी इच्छा असते. त्यानुसार कोणी जागा घेऊन घर बांधते, तर कोणी तयार बंगलो, फ्लॅट घेवून आपले घराचे स्वप्न पूर्ण करते. ज्यांचे बजेट नवीन घर घेण्याइतके नसते पण घराचे स्वप्न पूर्ण करायचे असते, अशी मंडळी सेकंडहॅण्ड अर्थात जुना फ्लॅट, घर घेतात. सध्या आर्थिक मंदीच्या काळात नवीन घर घेणे सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारे नसल्यामुळे अनेकजण जुने घर अथवा फ्लॅट खरेदीला प्राधान्य देत आहेत.
शहरात 1 बीएचके फ्लॅटसाठी लोकेशननुसार 20 ते 50 लाख रुपये मोजावे लागतात. 2 बीएचके फ्लॅटसाठी तर यापेक्षाही अधिक पैसे मोजावे लागतात. उपनगरातही बहुतांश ठिकाणी असेच दर आकरले जातात.
पिंपळे गुरुव, निगडी या परिसरात मात्र यापेक्षा खूप अधिक दर आहेत. त्यामुळे, नवीन घरासाठी एवढी मोठी रक्कम देणे परवडत नसल्यामुळे अनेकांनी सेकंडहॅण्ड घर, फ्लॅट विकत घेण्यास पसंदी दिली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, मंदीच्या काळातही जुन्या घर व फ्लॅटच्या खरेदी-विक्रीतून अनेकांना दिलासा मिळला आहे. मंदीच्या काळातही पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार मात्र तेजीतच राहिला आहे. शहरात दिवसाकाठी 35 ते 40 जुन्या घर व फ्लॅटची विक्री होत असल्याचे दुय्यम उपनिबंधकाकडून घेतलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे, बांधकाम क्षेत्रात मंदी असली तरी जुन्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीमधून दररोज कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे.
शेकडो मध्यस्थांनाही रोजगार
पिंपरी-चिंचवड शहरात जुने घर, फ्लॅटच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये शेकडोजण मध्यस्थ म्हणून काम करीत आहेत. एखाद्याला घर किंवा फ्लॅट हवा असल्यास आपल्या संपर्कात मध्यस्थ संबधित व्यक्तीला या फ्लॅटची खरेदी किंवा विक्री करण्यास मदत करीत असतात. अशा मध्यस्थांचे विक्री करणारे व खरेदी करणाऱ्या दोघांकडूनही कमिशनची रक्कम ठरलेली असले. त्यामुळे, सेकंड हॅण्ड फ्लॅटच्या व्यवसायातही शेकडो मध्यस्थांना रोजगार मिळत आहे.
ऑनलाइनमुळे सुलभता
ऑनलाईन वेबसाईटवर नवीन घरांबरोबरच जुने फ्लॅट, बंगले, घरे, विकण्याची जाहिरात मोठ्या प्रमाणात होत असते. सोशल मीडियामधूनही अशा जाहिरातांचा मारा मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑनलाईन वेबसाईटवरती प्रॉपर्टीच्या छायाचित्रासह किंमतीही दर्शविलेल्या असतात. त्यामुळे, अनेक जण आपल्याला पसंद पडलेली घर, फ्लॅट बंगलोज खरेदी करण्यासाठी मूळ मालक अथवा मध्यस्थांशी व्यवहार करतात.
भोसरी परिसरात जुन्या फ्लॅटची खरेदी विक्रीवर अलिकडच्या काळात कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. भोसरी उपनिबंधक कार्यालयात दिवसाकाठी 4 ते 5 जुन्या फ्लॅट अथवा बंगल्याची खरेदी विक्रीचे दस्ताऐवज करण्यासाठी नागरिक येत असतात. नवीन फ्लॅट घेणाऱ्यांची संख्या आर्थिक मंदीमुळे कमी झालेली असली तरी जुन्या घरांच्या खरेदी-विक्रीवर या मंदीचा कोणताही परिणाम झालेला नाही.
– लक्ष्मण भोसले, दुय्यम निंबधक, भोसरी